मुखेड, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डी. टी अंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे मुखेड येथे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुका अध्यक्ष आसद बल्खी यांच्या वतीने घेण्यात आली. त्यामध्ये मुखेड व्हॉलीबॉल क्लबने प्रथम बाजी मारत चषक पटकाविला, तर जे.एस. आर क्लबला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालय मैदानावर प्रकाश झोतात झालेल्या स्पर्धेत ०८ संघानी सहभाग घेतला होता.
संपादक जयभीम सोनकांबळे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुका अध्यक्ष आसद बल्खी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उदघाटन पार पडले. अंतिम सामन्यात मुखेड व्हॉलीबॉल क्लब संघाने जे.एस.आर क्लब संघाला प्रतिकाराची एकही संधी दिली नाही. सूरज राठोड यांनी आक्रमक खेळ करुन जे.एस.आर क्लबला नामोहरम करत १५-७ अशा दणदणीत विजयासह मुखेड व्हॉलीबॉलच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण झाले. मुखेड पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक पी.एस कुंभारे, संपादक जयभीम सोनकांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख शंकर चिंतमवाड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुका अध्यक्ष आसद बल्खी, कैलास कराड यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाना रोख बक्षीसासह चषक प्रदान करण्यात आले. संयोजक गजानन पांचाळ यांनी आभार मानले.
डी.टी.आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न ; व्हॉलीबॉल स्पर्धेत मुखेड व्हॉलीबॉल क्लब विजेता
128 Views