KINWATTODAYSNEWS

सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील प्रयोगशील राजा राजर्षी छञपती शाहूजी महाराज यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन

विशेष लेख
आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारात राजदंडाचा उपयोग लोककल्याणासाठी करून त्यांच्या ऱ्हदयावर अधिराज्य करणारे लोकराजे छञपती शाहूजी महाराज होते .1894 साली त्यांच्याकडे राज्याची सुञे आली . प्रथम त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानचा दौरा करून पाहणी केली . प्रजेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या . शुद्रातिशुद्रांची दयनीय अवस्था बघितली . त्यांच्या मागासलेपणाचे कारण प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेली वर्णव्यवस्था ,जातीव्यवस्था असून जन्माच्या आधारावर श्रेष्ठ- कनिष्ठत्वाची विषमतावादी समाजव्यवस्था आहे हे शाहूजी महाराजांनी ओळखले. कोल्हापूर संस्थानात ७१ अधिकाऱ्यांपैकी ६० अधिकारी ब्राम्हण तर ११ अधिकारी ब्राम्हणेत्तर होते . खाजगी कर्मचाऱ्यात ५३ पैकी ४६ ब्राम्हण तर ७ ब्राम्हणेत्तर होते .राजाराम काॕलेजला शिक्षण घेणाऱ्या ७९ विद्यार्थ्यां पैकी ७३ ब्राम्हण विद्यार्थी तर ६ विद्यार्थी ब्राम्हणेत्तर होते .त्याला लागून असणाऱ्या वस्तिगृहात सर्वच विद्यार्थी ब्राम्हण होते वास्तविक हे वस्तिगृह सर्व विद्यार्थ्यांसाठीचे होते .तेव्हा छञपती शाहूजी महाराजांनी शुद्रातिशुद्राच्या उद्दारासाठी , कल्याणासाठी शाळा, वस्तिगृह सुरू केली .खेड्यापाड्यातील प्रजेला शिक्षणाची अभिरूची नव्होती .अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी त्यांना शिक्षण देण्याचा वीडाच उचलला . मराठा, जैन, लिंगायत ,मुस्लिम इ. शुद्रातिशुद्रासाठी वेगवेगळी वसतिगृहे निर्माण करून तेथे त्यांना चांगले जेवन, पुस्तके ,शिष्यवृत्ती देऊन शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले .प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करून शिक्षणाचे सार्वञिकरण केले .ज्यांची मुले शाळेत येणार नाहीत त्यामुलांसाठी महिना एक रूपया दंड आकारण्यात आला .जे शिक्षक अस्पृश्यता पाळून विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक देत असल्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असा आदेश काढला .शाहूजी महाराज म्हणतात, इतिहास पहा कोणत्याही देशाची प्रगती शिक्षणाशिवाय झालेली नाही .शिक्षणाशिवाय तरोणउपाय नाही . शुद्रातिशुद्राच्या शिक्षणासाठी , उन्नतीसाठी आपले सर्वस्व पणास लावले .विरोध सहन केला पण हाती घेतलेले कार्य सोडले नाही .
ऐवढ्यावरच थांबले नाही त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी शुद्रातिशुद्रासाठी ५० टक्के आरक्षणाची तरतूद केली .तेव्हा ब्राम्हणानी त्यानिर्णयास विरोध केला .जे लायक नाहीत, ज्यांच्याकडे गुणवत्ता नाही तुम्ही त्यांना नोकरी देणार आहात ,रानडे सारखा व्यक्ती ब्राम्हण अधिकाऱ्यास म्हणतो , आपल्या सारखे त्यांना काम करता येईल का ? ,
सांगलीच्या पटवर्धन संस्थानातील वकील अॕड.गणपत अभ्यंकर कोल्हापूरात येऊन शाहूजी महाराजास म्हणातात, तुमचा हा निर्णय चुकला ,यामुळे कामात गुणवत्ता राहणार नाही . तेव्हा त्यास काहीही न बोलता महाराज घोड्याच्या तबेल्याकडे घेऊन जातात .घोड्याच्या तोंडाला बांधलेल्या तोबऱ्यातील हरभरे खात असतात. शाहूजी महाराज त्याठिकाणी असलेल्या कामवाल्यास सांगून घोड्याच्या तोंडाला बांधलेले तोबरे सोडून घ्या आणि या मोकळ्या जागेत हरभरे खायायला टाका .हरभरे टाकून घोडे सोडल्याबरोबर जे घोडे तरूण होते, शक्तीशाली होते, मोठे होते ते समोर आले आणि हरबरे खाऊ लागले ,खाताना नीट खात नव्होते तर पाठीमागून येणाऱ्या दुर्बल ,कमजोर ,म्हाताऱ्या ,आजारी ,घोड्यास लाथा मारत होते .शाहूजी महाराज अभ्यंकरास म्हणतात , सांगा अभ्यंकर या लाथा खाणाऱ्या घोड्यास काय गोळ्या घालू .अभ्यंकर तुम्ही जनावराची व्यवस्था माणसात आणली आणि मी माणसाची व्यवस्था जनावरात .प्रत्येकाच्या वाट्याचे ज्याचे त्याला दिले .मी जनावरावर अन्याय होऊ देत नाही.ही तर आपल्या सारखीच हाडामासाची माणसे आहेत त्यांच्यावर कसा अन्याय करू .यावर अभ्यंकर एक शब्दही न बोलता निघून जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपण ज्यांना लोकमान्य म्हणतो ते टिळक ही आरक्षण व वेदोक्त प्रकरणात शाहूजी महाराजांच्या निर्णयाच्या विरोधात होते . अथनी या ठिकाणी सभा घेऊन म्हणतात , तेली, तांबोळी, कुणबट्टानी काय संसदेत जाऊन नागर हाकायचा का ? असे बोलून आपण फक्त ब्राह्मणाचे नेते आहोत हे दाखवून दिले .
कोल्हापूर संस्थानात ज्यांच्याकडे लोक संशयाच्या नजरेने बघत , गुन्हेगार म्हणून ओळख असणाऱ्या लोकांना शाहूजी महाराजांनी मायेने जवळ केले . त्यांना विचारले तुम्ही असे चुकीचे काम का करता ? तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही भटके लोक पशू-पक्षांची शिकार करून उदरनिर्वाह करता ,पहिल्या सारख्या आता शिकारी मिळत नाही ,हाताला काम नाही त्यामुळे आमची मुले- बाळे उपाशी राहतात . तेव्हा शाहूजी महाराजांच्या लक्ष्यात आले याचे कारण दारिद्रय व बेकारी आहे .महाराजांनी त्यांना रस्ते , बंधारे ,तलाव , विहीरी ,घराच्या कामावर लावले .त्यांना पोटभर चांगले जेवन दिले , मुलांसाठी शाळा सूरू केल्या . शिकलेल्या मुलांना पोलीस , अंगरक्षक ,पहारेकरी अशा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार नोकऱ्या दिल्या .त्यांची हजेरी बंद करून माणसापासून दूर गेलेल्या माणसाला माणसात आणले .
समाजात गुलामगिरी टिकवून ठेवणाऱ्या अनेक प्रथा ,परंपरा होत्या . त्या बंद करण्याचे निर्णय घेतले . महार वतन बंद , जोगतीन- मुरळी प्रतिबंधक कायदा ,भटक्या विमुक्तांची हजेरी बंद ,कुलकर्णी वतन बंद करून तलाठी पद निर्माण , बालविवाह प्रथा बंद करून लग्नाचे वय निश्चित मुलीचे वय १४ तर मुलाचे वय १८ पेक्षा कमी असू नये ,सतिबंदी कायदा, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन ,मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी फीस माफीचे निर्णय घेतले , आंतरजातीय , धर्मीय विवाह घडवून आणले आपल्या चुलत बहीणीचे लग्न इंदोरच्या होळकर घराण्यातील मुलांसोबत केले , स्ञी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा , वेदोक्त प्रकरणात राजोपाध्ये या पुरोहीताचे वतन बंद , ब्राम्हणाचे अहंकारी वर्चस्व , व्यवस्था संपवण्यासाठी व शुद्रातिशुद्रांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुरोहीताचे शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या, क्षाञजगद्गुरू पद निर्माण केले या नि अशा अनेक कुप्रथा बंद केल्या .सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक ,धार्मिक सुधारणा करत असते वेळेस मोठ्या प्रमाणात विरोध झाला तरी आपल्या कार्यात महाराजांनी खंड पडू दिला नाही .
छञपती शाहूजी महाराज प्रयोगशील होते, कृतीशील विचारांचे होते .ते बोलूनच थांबले नाहीतर कृती केल्या . अस्पृश्यता घालवण्यासाठी त्यांनी प्रयोग केले .गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीस हाॕटेल टाकून दिले पण त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी कोणी येत नव्होते . शाहूजी महाराज सकाळी अंबाबाईचे दर्शन घेऊन परतत असताना तेथे थांबायचे आणि गंगारामला आर्डर द्यायचे गंगाराम चहा दे महाराज चहा पियायचे आणि सोबत असणाऱ्या वीस-पंचवीस लोकांनाही चहा पाजायचे .महाराजांनी हुकूम काढला ज्यांना शासकीय कागदपञावर सही पाहीजे त्यांनी दहा वाजता गंगाराम कांबळेच्या हाॕटेलला यायचे. अशाप्रकारे महाराज स्वतः चहा प्यायचे आणि सोबत आलेल्यानाही पाजायचे .असेच प्रकरण घडले एक अस्पृश्य महिला पाणी नसल्याने सार्वजनिक पाणवट्यावरून पाणी आणते तेव्हा सर्व सुवर्ण त्या महीलेस पाण्याने भरलेल्या घागरीसह महाराजाकडे आणतात .त्यांना सर्व प्रकार सांगतात सुवर्ण म्हणतात आमचा पाणवटा बाटवला तेव्हा महाराज त्या बाईस रागावतात जोरात बोलता- बोलता त्यांना खूपच खोकला आल्याने त्या बाईच्या घागरीतलं पाणी पितात आणि म्हणतात, मी बाईच्या घागरीतले पाणी पिले सांगा आता काय करायचे खोकलणे हे निमित्त होते .कृती ही अस्पृश्यता घालवणे होती .
अस्पृश्याच्या मुलाने डाॕक्टरेट मिळवली ही बातमी छञपती शाहूजी महाराजांना माहित झाली आणि महाराज निघाले मुंबईच्या परळ चाळीकडे डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी . महाराजांना बघितले आणि बाबासाहेबांना भरून आले .महाराजानी बाबासाहेबांना कोल्हापूरला येण्याचे आमंत्रण दिले .डाॕ.बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरात आल्यावर मिरवणूक काढून जंगी स्वागत केले , स्वागत समारंभात मानाचा जरीचा पटका बांधून सन्मान केला .त्यांना वेळोवेळी मदत केली .शाहूजी महाराज बाबासाहेबा संदर्भात म्हणतात , शुद्रातिशुद्रास नेता मिळाला पुढे तेच देशाचे नेतृत्व करतील आणि शाहूजी महाराजांची वाणी खरी ठरली .त्या दोघांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते .शाहूजी महाराजांच्या निधनाने बाबासाहेबांना फार दुःख झाले .डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,शाहूजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सण,उत्सवा प्रमाणे साजरी करावी .
राजर्षी छञपती शाहूजी महाराजांनी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या विचार आणि कार्याचा वारसा खऱ्या अर्थाने चालविला .मी छञपतीच्या गादीस गालबोट लागेल असे कोणतेही काम करणार नाही .रोज सकाळी अंगोळी नंतर छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत असत बाहेर ठिकाणी असल्यास आपल्या हातावर गोंदलेल्या महाराजांचे दर्शन घेत असत .छञपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन बहुजनांचे स्वराज्य निर्माण केले .लोककल्याणकारी राज्यकारभार केला .त्यांचा हा वारसा शाहूजी महाराजांनी चालविला .बहुजनांना प्रेरणा मिळावी म्हणून कृष्णाजी केळुस्कर गुरूजी कडून छञपती शिवरायांचे अस्सल चरित्र लिहून घेतले त्यासाठी त्यांना आर्थिक मदतही केली .महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांना मुर्त स्वरूप देण्याचे काम महाराजानी केले .
छञपती शाहूजी महाराजांचे कार्यक्षेत्र करवीर नगरी पुरते मर्यादित नव्होते तर ते देशपातळीवरचे असल्याने परंपरावाद्यानी इंग्रजांचे कान भरले .त्यांच्या सांगणावरून इंग्रजांनी महाराजांना पञ लिहून कळविले तुम्ही तुमचे कार्य थांबविले नाहीतर तुम्हाला पदच्युत करण्यात येईल . त्यावर शाहूजी महाराज म्हणतात ,तुम्ही पदच्युत करण्याच्या अगोदर मी राजीनामा देईन पण हाती घेतलेले समाजोन्नतीचे कार्य थांबविणार नाही .महाराज राजा असून ही जेव्हा संस्थानातील लोक इयत्ता तिसरी पर्यंतचे शिक्षण घेतील तेव्हा मी त्यांच्या हाती राज्यकारभाराची सुञे देऊन पेन्शन घेईन .एक राजा राजेशाहीत राज्यकारभाराची सुञे प्रजेच्या हाती देण्यास तयार होतात .स्वतंत्र भारतात लोकशाहीत सत्तेला गोचिडा सारखे चिटकलेले सत्ता सोडायला तयार नाहीत उलट ती मिळविण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. राजा असल्याने ऐशआरामात , भोगविलासात दुसऱ्या राजा प्रमाणे जगता आले असते पण तसे न करता राजदंडाचा उपयोग लोककल्याणासाठी केला तर आज लोकशाहीत लोकांच्या हाती सत्ता असताना लोकप्रतिनिधी सत्तेचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करताना दिसून येते .
एका बाजूला महामानवाची नावे घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विचार आणि कार्याच्या विरुद्ध कृती करायची हा धंदा सुरू केलेला दिसून येतो. या परिस्थितीला जबाबदार आपणच आहोत .हक्क ,अधिकार ,
आरक्षणाचा लाभ घेऊन बहुजनांत नवा ब्राम्हण वर्ग उदयास आला आहे .आपले हितसंबंध जोपासण्यासाठी तडजोड करत असतो .तेव्हा आपल्या महामानवाच्या त्यागाचा इतिहास आपण विसरतो . विश्वरत्न ,महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात ,या शिकलेल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला मला वाटले शिकतील आणि आपल्या समाजाकडे वळून बघतील पण तसे झाले नाही ते आपल्या बायका मुलांच्याच विचारात मग्न आहेत .
आज खऱ्या अर्थाने गरज आहे छञपती शाहूजी महाराजांच्या विचारांची आजच्या घडीला तेच तारू शकतात . देशात जात, धर्म द्वेषाचे वातावरण तापलेले आहे त्यास काही अंशी आपणही जबाबदार आहोत कारण आम्हाला त्यांच्या सर्वसमावेशक विचारधारेचा विसर पडला आहे .आपण ही विचारधारा लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे .लोकजागृती केली पाहीजे. आपल्या सर्वांना असे वाटते आम्हाला सर्वच इतिहास माहीत आहे वास्तविक पाहता काहीच माहीत नाही .माहित जर असते तर आपण बहुजन समाजाला तोडण्याच्या ऐवजी जोडण्याचे काम केले असते .आज बहुजन म्हणून घेणाऱ्या काही विद्वान लोकांना सवर्णाचा भलताच पुळका आलेला आहे .ते त्यांच्यासाठी मरायला देखील तयार आहेत असे वक्तव्य करत आहेत .अशा बहुजनवादी म्हणून घेणाऱ्यानी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे .बहुजनांना जोडण्याचे काम केल्यासच आईच्या ममतेने आपल्या प्रजेवर प्रेम करणाऱ्या लोकराजा राजर्षी छञपती शाहूजी महाराजांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन ठरेल .

जय जिजाऊ ..जय शिवराज..
**दगडू भरकड **
मराठा सेवा संघ , किनवट

166 Views
बातमी शेअर करा