KINWATTODAYSNEWS

गटविकास अधिकारी सुभाष धनवे तालुकाभर भटकंती करत शेतशिवारात जाऊन शेतमजूर महिलांना पटवून देताहेत लसीचे महत्व

किनवट : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी तालुक्यातील गावांना भेटीचा सपाटा लावला असून त्यांनी शेतात जाणाऱ्या शेतमजूर महिलांना शेतशिवाराजवळ गाठून कोरोना लस ही आपल्या जीवाला कशी योग्य आहे याची माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आखलेली “मिशन कवचकुंडल ” अंतर्गत विशेष लसीकरण मोहीम आणि सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून दोन नोव्हेंबर रोजी किनवट तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या शंभर गावात “मिशन 10000 ” विशेष लसीकरण मोहीमेला यशस्वी करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने गट विकास अधिकारी रात्रंदिन तालुकाभर भेटी देत आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, बाल विकास प्रकल्पाधिकारी आश्विनी ठकरोड व मिडिया जनजागृती कक्षाचे उत्तम कानिंदे यांना सोबत घेऊन बेंदी तांडा, चिखली (बु ), टिंगणवाडी , बोधडी (बु ) व थारा आदी गावांना भेटी दिल्या. गरोदर माता, मुस्लिम बांधव, दुकानदार यांना लसीचे महत्व पटवून दिले. त्यानंतर विस्तार अधिकारी (आरोग्य) अमृत तिरमनवार यांचे समवेत सिरमेटी, घोटी, खेरडा, मलकापूर, मारेगाव, कनकवाडी, सिंदगी, मोहपूर, शनिवारपेठ, दाभाडी या गावांना भेटी दिल्या. दाभाडी शेतशिवारात शेतीत जाणाऱ्या शेतमजूर महिलांना थांबवून लसीचे महत्व पटवून दिले. लस ही आपल्या शरीरात सैन्यासारखं काम करेल असे पटवून दिले व “आम्ही लस घेणार” हे त्यांच्याकडून अभिवचन घेतले.
स्वतः गट विकास अधिकारी तालुकाभर फिरत आहेत म्हणून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशावर्कर सर्वजन लसीकरणाच्या कामाला झटून लागले आहेत. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेने वेग घेतला आहे.

559 Views
बातमी शेअर करा