*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:आज सकाळी स्थानिक गुन्हा शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने वाजेगाव येथे जनावरांच्या कत्तलखान्यासमोर बळजबरीने एका चार चाकी गाडीत डांबलेले सात बैल पकडले आहेत. चार चाकी गाडीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्येमालाची किंमत 4 लाख 80 हजार रुपये आहे.या प्रकरणी बैलांना वेदना देवून वाहतुक करणाऱ्या दोन जणांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आज दि.23 ऑक्टोबर रोजी नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे,पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, विश्र्वनाथ पवार असे गस्त करत असतांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार तानाजी येळगे, रणधिर राजबंशी यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाला माहिती दिली की, वाजेगाव पोलीस चौकीजवळ कत्तल खान्याच्या आसपास एका छोट्याशा चार चाकी गाडीत 7 बैल वेदना देवून डांबन्यात आलेले आहेत. दोन्ही पथकांनी जावून याची तपासणी केली असता तेथे चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.26 बी.ई.4728 मध्ये सात बैल अत्यंत निरदयीपणे त्यांना वेदना होईल अशा अवस्थेत कोंबलेले होते.या बाबत विचारणा केली असता महंमद सिकंदर महंमद खयुम रा.वाजेगाव,मोईज व्यापारी रा.उस्माननगर आणि फसल अब्दुल मजीद या तिघांनी सांगितले की, हे बैल कत्तल करून त्यांचे मास विक्री करण्यासाठी आणले आहेत.
पोलीसांनी हे सर्व सात बैल आणि चार चाकी गाडी असा 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यापैकी एक बैल मरण पावला होता. त्यासाठी सविस्तर माहिती मिळावी म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.या गाडीचा चालक जबीर उल्ला खान जयरुल्ला खान हा आहे.पोलीस अंमलदार संतोष जाधव यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राण्यांना कु्ररतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा अधिनियम 1960 च्या कलम 11 (1) (घ), 11(1)(च) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राण्यांना कु्ररतेने वागणूक देणाऱ्या ताब्यातून त्यांना मुक्त करणाऱ्या संयुक्त पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.