“मिशन कवचकुंडल” अंतर्गत 75 तास विशेष लसीकरण मोहीमेला गती देण्यास प्रत्येकाने लस घ्यावी असे केले आवाहन
किनवट : तालुक्यातील बोधडी (बु) येथे गुरुवार (दि.21 ) रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बाजारपेठेतील अनेक दुकानात जाऊन कोरोना लस घेतली काय ? याची विचारणा केली व प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन केले.
बोधडी (बु) गाव हे लसीकरणाच्या टक्केवारीत जिल्ह्यात सर्वात कमी असल्याने “मिशन कवचकुंडल” अंतर्गत 75 तास विशेष लसीकरण मोहीमेची पाहणी करण्यासाठी ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचे समवेत बोधडी (बुद्रुक) येथे आले होते.
सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांनी भेट दिली आणि लसीकरणाची माहिती घेतली. कमी टक्केवारी का आहे ? याविषयी संबंधित आरोग्य अधिकारी -कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या प्रसंगी गटविकास अधिकारी सुभाष धनवे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे , गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने , बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड , वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मराज पवार , डॉ. मनोहर शिंदे , अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती कचकलवड , उत्तम कानिंदे आदींसह आरोग्य कर्मचारी , शिक्षक अंगणवाडी सेविका व आशा वर्कर आदींची उपस्थिती होती.
लसीकरणाच्या विशेष मोहिमेस गैरहजर असलेल्या ग्रामसेवक व तलाठी यांचेवर निलंबनाची कारवाई करावी असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, तहसिलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव व गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांना सूचित केले.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आपल्या सर्व फौजफाट्यासह मार्केट परिसरात आले. प्रत्येक दुकानात जाऊन त्यांनी विचारणा केली, लस घेतली काय ? हो म्हणताच मोबाईल मध्ये लस घेतल्याचा पुरावा दाखवा असे ते म्हणाले आणि मोबाईल सुद्धा पाहिला. एक दुकानदार फुल देऊन स्वागत करत होते. तेव्हा ते म्हणाले, लस घेतली असेल तरच स्वागत स्विकारतो. प्रत्येक दुकानावर जाऊन त्यांनी विचारणा केली की,आपण लस घेतली काय ? घरच्या मंडळींना लस दिली काय ? शेजारी , नातलगांनी लस घेतली काय ? नोकरांना लस दिली काय ? एक डोस घेतला की दोन डोस ? अशी विचारणा केली. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गंगाधर सिरमवार यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की, सर्व दुकानदार व नोकर यांनी लस घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा नाईलाजाने दुकाने बंद करण्याची कारवाई करावी लागेल. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरल्याने सर्वजण अवाक झाले होते. त्यांनी केलेल्या आवाहनामुळे लस घेण्यास प्रवृत्त होऊन अनेकांची पावले लसीकरण केंद्राकडे वळल्याचे आशादायी चित्र दिसू लागले. प्राथमिक आरोग्य केंद्र बोधडी (बु) येथे एकाच दिवशी 472 व्यक्तींनी लस घेतली.