KINWATTODAYSNEWS

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक यांना रुग्णालयाच्या विविध समस्या बद्दल निवेदन

किनवट /प्रतिनिधी : उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे मुबलकऔषधी साठा अतिरिक्त बेडव्यवस्था करून वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना नियमित सेवा देण्याची सक्ती करावी व निष्काळजीपणे उपचार करून रेफर करणाऱ्या डॉक्टरावर निलंबनाची कार्यवाही करावी असे लेखी निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले आहे

निवेदनात नमूद केले की किनवट माहूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात आधुनिक दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली परंतु या रुग्णालयात ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजवंत रुग्णांना वेळेवर योग्य पद्धतीने उपचार व औषधी मिळणे अवघड बनले आहे. रुग्णालयात विविध आजारासाठी उच्च प्रतीची व अत्याधुनिक दर्जाची साधन सामग्री उपलब्ध असतानाही केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व मनमानी सेवेमुळे ही सामग्री कुचकामी ठरत आहे.एक्स-रे, सोनोग्राफी यासह अन्य अत्यावश्यक विभाग सतत बंद अवस्थेत दिसून येतात. गंभीर रुग्णावर तातडीने प्राथमिक उपचार करण्याऐवजी रेफर करण्यात येते. तज्ञ डॉक्टर सातत्याने गैरहजर राहतात. केवळ दोन ते तीन डॉक्टर व दोन-तीन परिचारिकेचेवरच रुग्णालयाचा संपूर्ण कारभार असतो. बहुतांश डॉक्टर प्रतिनियुक्तीवर अन्य ठिकाणी सेवा बजावत आहेत तर अनेक डॉक्टर या ना त्या कारणाने गैरहजर राहत असतात.नियुक्त डॉक्टरांपैकी अनेक डॉक्टरांचे किनवट शहरात मोठमोठे खाजगी दवाखाने असल्यामुळे ते रुग्णालयापेक्षा त्यांच्या खाजगी दवाखान्यात काळजीपूर्वक उपचार करतात. रुग्णावर डॉक्टरकडून समाधानकारक उपचार होत नसल्याच्या असंख्य तक्रारी होतात परंतु त्यावर वरिष्ठ आरोग्य प्रशासन लक्ष घालत नाहीत. रुग्णाची तपासणी केल्यानंतर महत्त्वाची व जास्त किंमत असलेली औषधी बाहेरील खाजगी औषधी दुकानातून मागविण्यात येते. औषधींचा नेहमीच तुटवडा असतो तर रुग्णालयाच्या परिसरात नेहमीच दुर्गंधी असते. डॉक्टरांच्या मोघम उपचारावरून कित्येकवेळा रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवतात. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागण्यामुळे बहुतांश गोरगरीब ईच्छा नसतानाही खासगी रुग्णालयाचा आधार घेतात.रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रुग्णांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नियुक्त केलेली रुग्ण कल्याण समिती नावालाच उरली असून त्यांच्याकडून रुग्णालयाच्या कारभारावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. येथील डॉक्टर व परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे यापूर्वी कित्येक गंभीर रुग्ण रेफर काळात मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात मुबलक औषधी साठा, अतिरिक्त बेड त्वरित उपलब्ध करावे तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नियमित योग्य प्रकारे सेवा देण्याची सक्ती करून निष्काळजीपणा करणाऱ्या तसेच सतत गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. रुग्णालयाचा कारभार सुधारला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे किसनराव राठोड, राहुल कापसे सम्राट कावळे अजित खान पठाण, आदित्य भवरे,राहुल गिमेकर, आमीन चौहान हकिम चव्हाण, विशाल हलवले, मिलिंद वाठोरे, सुधाकर हलवले, विजय पाटील, ऋषिकेश कांबळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

112 Views
बातमी शेअर करा