*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.20.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अनेक जेष्ठ नागरिकांनी पी.एच.डी.करावी. त्यांच्या अनुभवातून समाज उपयोगी संशोधन व्हावे.असा उदार हेतू लक्षात घेवून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या आदेशान्वये आणि विद्यापरीषदेच्या बैठकीतील निर्णयानुसार जेष्ठ नागरिकांना पी.एच.डी.कोर्सवर्क मधून सूट देण्यात आलेली आहे.
जेष्ठ नागरिक म्हणून वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना विद्यापीठामध्ये पी.एच.डी.करणे सोपे झाले आहे.पीएच.डी. करण्यासाठी पेट (PET-Ph.d. Enterance Test) परीक्षा पास होणे आवश्यक आहे. पण जेष्ठ नागरिकांना यामधूनही सूट देण्यात आलेली आहे.त्यामुळे आता जेष्ठ नागरिकांना पेट परीक्षा देणे आवश्यक नाही.यासाठी जेष्ठ नागरिकांचे वय ६० वर्ष पूर्ण असावे,कोणत्याही अभ्यासक्रमातील पदव्युत्तर परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असावेत आणि ज्या विषयामध्ये पी.एच.डी.करावयाची आहे त्या क्षेत्रातील किमान १५ वर्षाचा अनुभव असल्यास पेट मधून सूट देण्यात येत असते.शिवाय नव्यानेच घेण्यात आलेल्या निर्णयानुसार जेष्ठ नागरिकांना पी. एच.डी.करत असतांना जी कोर्सवर्क ची परीक्षा देणे आवश्यक होते. त्यामध्ये आता सूट देण्यात आलेली आहे. यापुढे जेष्ठ नागरिकांना कोर्सवर्क ची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.
जेष्ठ नागरिकांच्या पाठीशी असलेला अनुभव हा समाज उपयोगी व्हावा, प्रबंधाद्वारे समाजाला त्याचा उपयोग व्हावा असा विशाल दृष्टीकोन समोर ठेवून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या पुढाकाराने विद्यापारीषदेच्या बैठकीमध्ये सदर निर्णय घेण्यात आलेला आहे.असे सांगण्यात आले आहे.