KINWATTODAYSNEWS

बहाद्दरपूरा येथे हजरत महंमद पैगंबर यांची जयंती रक्तदान करुन ईद केली साजरी ; सर्व जातीधर्मातील ६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कंधारः- (डॉ.माधव कुद्रे)
हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस योमे विलादत दरवर्षी इस्लामिक तिथी नुसार १२ रब्बीउल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु देशावर कोरोनाचे सावट असल्याने गेल्या वर्षीपासून सर्वच महापुरुष व महामानवांच्या उत्सव साधेपणाने साजरी केली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून बहाद्दरपुरा येथील मुस्लीम युवकांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सर्वच जाती धर्मातील ६३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन मोहम्मद पैगंबर यांची ईद मिलाद साजरी केली.
हिंदू- मुस्लिम एकतेचा संदेश देत इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर सल. यांनी सर्व जगाला मानवतेचा व एकतेचा संदेश देऊन इस्लाम धर्माचा प्रचार व प्रसार केला. मंगळवार दि.१९ आॕक्टोबर २०२१ रोजी इस्लाम तिथीनुसार त्यांचा जन्मदिवस योमे विलादात साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभरात ‘इद ए मिलाद’ म्हणून मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने ईद साजरी करतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध लक्षात घेता, मुस्लिम बांधवानी ईद घरातच साजरी केली. सध्या मुस्लिम बांधवामध्ये परिवर्तन होत असून शिक्षणावर जास्तीचा भर दिला जात आहे. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानासाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत व माणुसकी हाच खरा धर्म आहे, अशी हजरत मोहम्मद पैगंबर यांची शिकवण लक्षात घेऊन कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बहादरपुरा येथील जामा मस्जीदचे इमाम यांच्या हस्ते करण्यात आले होते. बहाद्दरपूरा या गावात गेल्या अनेक वर्षापासून हिंदू आणि मुस्लीम हे एकतेने राहत असतात. हिंदूंच्या सणात मुस्लीम सहभागी होतात, तर मुस्लिमच्या सणात हिंदू सहभागी होतात. हा आजपर्यंतचा येथील इतिहास आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बहाद्दरपुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात हिंदू बांधवांनीही मोठ्या प्रमाणात रक्तदान करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या, तर मुस्लीम बांधवांनी रक्तदान करून ईद-ए-मिलाद साजरी केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन पाटील पेठकर, मुस्तफा खांन, शेख हैदर, कलीम लखेरे, अवधूत पेठकर, संजय एमेकर होते, तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख युसुफ ग्रा.प.सदस्य, हैदर लखेरे, फेरोज पठाण, आसिफ पठाण, कासार अजिम, जमिर पठाण यांनी परिश्रम घेतले. तर दि.क्रिसेट ब्लड सेंटर महम्मद, अली रोड, नांदेड या रक्तपेढीच्या टिमने रक्तसंकलन केले.

85 Views
बातमी शेअर करा