KINWATTODAYSNEWS

सप्तसुरांच्या स्वरांनी ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन ‘ संध्या न्हाहली

किनवट : आदिजन संस्था संचलित वामनदादा कर्डक संगीत अकादमी संचाच्या वतीने राजर्षी शाहूनगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे सप्तसुरांच्या लयबद्ध गितांच्या सादरीकरणाने ६५ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात झाला. सप्तसुरांच्या स्वरांनी ‘धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन’ संध्या न्हाहली


भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते बोधी पुजा व ज्ञानदीप प्रज्वलाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी विहार स्मारक समितीचे अध्यक्ष भारत कावळे व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सामूहिक वंदना घेण्यात आली. पुणे येथील रेखा सोनवणे यांनी मिश्र रागात ‘तथागताला वंदुया…’ हे वंदन गीत, साम वाहिनी गायक सुरेश पाटील यांच्या साथीने शिवरंजनी रागातील ‘दीक्षा आम्हा दिली भीमाने… ‘ हे युगलगीत गाऊन टाळ्या मिळविल्या.
संगीतविशारद गायिका आम्रपाली वाठोरे यांनी अहिर भैरवच्या स्वरात ‘बोध हा बुद्धाचा… ‘ व शिक्षक रुपेश मुनेश्वर यांच्या साथीने हंसध्वनी रागातील ‘माझ्या भीमाची पुण्याई…’ हे युगलगीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रज्ञाचक्षू गायक प्रदीप नरवाडे यांनी जोनपुरी रागात ‘महाज्ञानाच्या महामानवाला…’, रागेश्रीत ‘दाराकडे वळली तुझ्या… ‘ व भूपालीच्या कर्णमधुर स्वरात ‘सद् धम्मदीधला या जगा…’ हे गीत गाऊन सभागृहात टाळ्यांचा पाऊस पाडला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुरेश पाटील यांनी वामनदादा कर्डक रचित ‘चांदण्याची छाया .. ‘ हे यमन रागातील व ‘तुझ्या पाऊलखुणा भीमराया… ‘ ही पुरियाधनश्रीतील गझल व खास महिलांसाठी मनोजराजा लिखित ‘पत्रात लिहिते रमा… ‘ या रमाई गीताच्या भावस्पर्शी सादरीकरणाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. उभरते कलावंत गायक रुपेश मुनेश्वर यांनी ‘कायदा भिमाचा… ‘ व ‘बोधी गयेचा शितल वारा..’ ही गीते बहारदार गाईली. भीमराव पाटील यांनी ‘उद्धरली कोटी कुळे…’ ही रचना गायली. राजानंद गडपायले रचित ‘बुद्ध विहारी जाऊया… ‘ हे संदेश गीत आम्रपाली वाठोरे व सुरेश पाटील यांनी सादर केले. प्रारंभ केलेल्या रेखा सोनवणे यांच्याच ‘ कुंभारा परी तू भीमा…’ या प्रसिद्ध गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सिंथेसायझर प्रदीप नरवाडे, संयोगिनी प्रकाश सोनवणे व बालाजी वाढवे, तबला व्यंकट मुंडावरे, ढोलकी साहेबराव वाढवे यांनी साथ संगत केली. रुपेश मुनेश्वर यांनी निवेदन व बंडू भाटशंकर यांनी आभार मानले. राष्ट्रदीप कयापाक यांनी उत्तम ध्वनिक्षेपण यंत्रणा उपलब्ध करून दिली.
याप्रसंगी बौद्ध महासभेचे वसंत सरपे, महेंद्र नरवाडे , अनिल उमरे, गंगाधर कदम, बौद्ध उपासक संघाचे प्रा.डॉ.पंजाब शेरे, प्रा.आनंद सरतापे, मंगेश म्हात्रे, सदानंद पाटील, जगदीश भालेराव, विनय वैरागडे, महिला मंडळ कार्यकर्त्या निलावती गरुड, वसुधा मेश्राम, स्मिता कानिंदे, सुषमा पाटील, सुवर्णा मुनेश्वर, गंगासागर वैरागडे, स्मिता जाधव, सरिता झडते, करुणा पवार, हर्षलता भगत, संगीता पाटील, ऍड. दीपा सोनकांबळे, स्वाती डवरे, कांचन सरपे व संगीता मुनेश्वर आदिंसह बहुसंख्य रसिक उपस्थित होते.

76 Views
बातमी शेअर करा