KINWATTODAYSNEWS

मिशन कवचकुंडल” अंतर्गत फिरते लसीकरण व रात्रीचे लसीकरण उपक्रम राबवून लसीकरणास दिली चालना

किनवट : “मिशन कवचकुंडल”‘ अंतर्गत शहरात फिरते लसीकरण केंद्राद्वारे दुकानात व तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीची लसीकरण मोहीम राबवून शेतकरी – शेतमजूरांचं लसीकरण करण्यात येत आहे. या विशेष मोहीमेतून कोविड लसीकरणाने गती घेतली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आखलेल्या “मिशन कवचकुंडल” या विशेष लसीकरण मोहिमेला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा मुख्याधिकरी डॉ. मृणाल जाधव यांनी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन गती दिली आहे.

उपजिल्हा रुग्णालय गोकुंद्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, नागरी दवाखान्याचे डॉ. किरण नेम्माणीवार व डॉ. संतोष गुंटापेल्लीवार यांनी शहरात ” फिरते लसीकरण केंद्र ” सुरु केले. विविध व्यवसाय सांभाळणारे दुकानदार हे सकाळीच दुकानात यायचे व रात्रीच घरी जायचे. मधल्या काळात दुकान सोडून लस घेण्यास लसीकरण केंद्रावर येत नाहीत, हे लक्षात आल्यावर प्रत्येक दुकानात जाऊन लस न घेतलेल्यांना लसीचं महत्व सांगून त्यांच्या इच्छेने दुकानचालक व तेथील कामगार यांना लस देत आहेत. तहसिलदार तथा मुख्याधिकरी डॉ. मृणाल जाधव यांनी स्वतः शहरात फिरून या मोहिमेला गती दिली. पहिल्याच दिवशी 40 व्यक्तींना लस दिली. एकाच दिवशी शहरात 260 जणांनी लस घेतली . या पथकात डॉ. श्रीमती पल्लेवाड, आरोग्य सेविका वाढई व मडावी, पालिकेचे चंद्रकांत दुधारे, अतिक, रमेश नेम्माणीवार, राजू पिल्लेवार आदिंचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर हे सकाळीच शेतात जातात व संध्याकाळी घरी येतात. त्यामुळे दिवसभर गावात थांबून कोविड लसीकरण पथकाला रिकामच परतावं लागायचं. तेव्हा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी ” रात्रीचं लसीकरण ” मोहिम आखली. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यात सहभागी झाले. या उपक्रमाला तालुक्यात अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी दरसांगवीतांडा, दुधगाव येथे 16O व इस्लापूर दुर्गा मंडळात 83 लसीकरण झाले.

73 Views
बातमी शेअर करा