KINWATTODAYSNEWS

कविंच्या शब्द प्रभावाने काव्य पोर्णिमा प्रखर उजळली.. क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा उपक्रम !

किनवट :येथील सिध्दार्थ नगरातील जेतवन बुद्धविहारात भाद्रपद पोर्णिमेनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानने आयोजिलेली ‘काव्यपोर्णिमा’ कविंच्या शब्द प्रभावाने प्रखर उजळली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणीसाकार प्रा. गजानन सोनोने होते.
भारतीय बौध्द महासभेचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष (पर्यटन व प्रचार) महेंद्र नरवाडे यांनी वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरवात केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. रविकांत सर्पे , उत्तम कानिंदे , रुपेश मुनेश्वर , राजेश पाटील , रमेश मुनेश्वर , मनोहर पाटील , पवन सरपे, निखिल कावळे उपस्थित होते.

प्रत्येक पोर्णिमा काव्य पोर्णिमा व्हावी. त्यानिमित्ताने बुद्धविहारत सर्वांनी आले पाहिजे. विविध विषयावर चर्चा झाली पाहिजे. नवनिर्मिती झाली पाहिजे. या प्रामाणिक उद्देशाने हा उपक्रम सुरू करित असल्याचे क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे निवेदन रमेश मुनेश्वर यांनी प्रास्ताविकातून प्रसृत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गजाननन सोनोने यांनी सुंदर रचना सादर करून कार्यक्रमात रंगत आणली –

“गातो मी गाने निळ्या नभाचे
आहे तराणे नव्या दमाचे
स्वातंत्र्य समता ही बंधूता
जाणून घ्या हो मोल तयाचे ”

त्यानंतर सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी ‘बुद्धप्रकाश’ नावाची रचना सादर करून दाद मिळवली –

“हजोरो वर्षाच्या रुक्ष
वाळवंटी तुझ्या भावनेला
देऊदे आता धम्मपथावर
अन मिळू दे बुद्धप्रकाश ! ”

गीतकार रुपेश मुनेश्वर यांनी गेय रचना सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या –

“हिंसा नको कधिही कायेने वाचेने
ठेवावे शुद्ध आचरण बुध्दाचे सांगणे ”

युवाकवी राजेश पाटील यांनी लेखणीचे महत्व विशद करणारी रचना सादर केली –

” पेटली पेटली ही भीमाची लेखणी
वाचली वाचली ही वामनाची लेखणी ”

रमेश मुनेश्वर यांनी ‘ पोर्णिमा ‘ शिर्षक असलेली रचना सादर करून दाद मिळवली –

“पोर्णिमेसम सुंदर असावं आयुष्य
पोर्णिमेसम तेजोमय व्हावं आयुष्य
खाच खळगे अनुभवतो कधी केव्हाही
चंद्रकला शिकवितात जगणं आयुष्य ”

अशा एकापेक्षा एक सुंदर रचना सादर करून कविंनी काव्यपोर्णिमेत रंगत आणली. आणि उपस्थित श्रोत्यांनी टाळ्याच्या गजरात साद दिल्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले व प्रा. रविकांत सर्पे यांनी आभार मानले.

75 Views
बातमी शेअर करा