आमदार भीमराव केराम यांनी दिला कार्यकर्त्यांना न्याय! आगामी स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपाचा एकहाती झेंडा फडकवण्याचा निश्चय.
श्री क्षेत्रमाहुर /वि. प्र.पद्मा गि-हे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व किनवट माहुर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी युवा नेते सुमित राठोड यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी तर अॅड. रमन जायभाये यांची डॉ. शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ विधानसभा संयोजक पदी निवड करून मोठी जबाबदारी या दोन्ही युवा नेत्यांवर देऊन आगामी माहुर नगर पंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीवर एकहाती भाजपाचा झेंडा फडकवण्याचा संकल्प केला आहे.
पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत सुमित राठोड यांनी २०१६ ते २०१९ पर्यंत किनवट माहुर तालुक्यातील जवळपास १३,५०० गोरगरीब कुटुंबियांना मोफत गॅस कनेक्शन वाटप केले होते व त्याचा प्रत्यक्ष फायदा महायुतीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार खा. हेमंत पाटील व विधानसभेचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांना मतपेटीतून झाला होता व आमदार भीमराव केराम यांचा विधानसभेत झालेल्या विजयात सुमित राठोड यांनी खारीचा वाटा उचलला होता तसेच आपल्या संघटन कौशल्य व बुथ रचनेच्या जोरावर अॅड.रमन जायभाये यांनी सुध्दा मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे माहुर तालुक्यातील या दोन्ही बंजारी-वंजारी युवा नेत्यांनी आमदार भीमराव केराम यांचे खंदे समर्थक म्हणून उदयास आले व आपल्या सच्च्या कार्यकर्त्यांना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व आमदार भीमराव केराम यांनी पक्षाची मोठी जबाबदारी देऊन न्याय दिल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत आहे. अनेक मान्यवरांनी दोघा युवा नेत्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.