सेवाग्राम: राज्यातील विविध शहरातून उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे राजकीय पटलावर लक्ष वेधून घेणा-या, राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ लाभलेल्या स्वराज्य ध्वज पूजन मोहिमेच्या पाचव्या दिवसाची सांगता आज वर्ध्याच्या महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात झाली. दिवसभरात शेंडगावचे श्री संत गाडगेबाबा मंदिर, अमरावतीचा परकोट किल्ला, मोझरीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर आदी ठिकाणी भेट दिल्यानंतर हि ध्वज पूजन मोहिम वर्ध्यात सेवाग्राममध्ये पोहोचली आहे. सेवाग्राम आश्रमात राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ किटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरज देवळीकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष आशिष लोखंडे, युवक जिल्हा महासचिव प्रणय कदम, युवक जिल्हा सचिव सचिन ठाकरे, महिला जिल्हा अध्यक्ष ज्योतीताई देशमुख आदी मान्यवरांनी ध्वजाला अभिवादन करून त्याचे पूजन केले. ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या ध्वज पूजन मोहिमेचा पहिला टप्पा आज दिवसाअखेर वर्ध्यात येऊन पूर्ण झाला आहे. यापुढील टप्प्यात हि मोहिम भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, नांदेड, हिंगोली, जालना इत्यादी ठिकाणी पोहोचणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून अवतरलेल्या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी आपुलकीने आणि जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. या ध्वज पूजन मोहिमेने आज यशस्वी पाचव्या दिवसात पदार्पण केले आहे. आतापर्यंत आठ जिल्ह्यांना भेट देत सोमवार दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज मोहिमेचा प्रवास विदर्भात येऊन पोहोचला आहे.
युवानेते रोहित पवार यांची अनोखी संकल्पना असलेल्या स्वराज्य ध्वजाच्या या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरूवात झाल्यापासून गेले चार दिवस नगर, कर्जत-जामखेड, जुन्नर, नाशिक, धुळे, बुलढाणा अशा अनेक शहरातून स्थानिक जनतेने भरभरून उत्साही प्रतिसाद देऊन ठिकठिकाणी ध्वजाचे दिमाखात स्वागत केले आहे. स्वराज्यध्वजाच्या प्रवासाचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरात ध्वजाचे मंगल पूजन करून झाला होता. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला, लेण्याद्री देवस्थान, ओझरचे विघ्नेश्वर देवस्थान, श्री साईबाबा संस्थान शिर्डी, सप्तश्रृंगी देवी मंदिर, याहमोगी माता मंदिर, शेगावचे संत गजानन महाराज मंदिर आदी ठिकाणी जाऊन ध्वज मोहिमेने आशिर्वाद घेतले आहेत.
सर्व जातीधर्मांच्या लोकांना हा स्वराज्य ध्वज आपलासा वाटत असून महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी शहरा-शहरात जाणारा हा ध्वज मोहिमेचा संकल्प प्रवास मोठे योगदान देत आहे. लोकसहभागातून होणारा हा प्रवास कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून होत आहे. हि ध्वज यात्रा एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे, या काळात राज्यातील अनेक प्रेरणास्थाने व श्रद्धास्थाने येथे आवर्जून भेट दिली जाणार आहे.
मानवतेचे आणि भक्ती-शक्तीचे प्रतिक असणारा हा स्वराज्य ध्वज सर्वच जाती-धर्माच्या लोकांसाठी स्फूर्तीदायी आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एक अभिमान वीरपताका म्हणून भगव्या ध्वजाचं महत्त्व उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली संपन्न इतिहास युवावर्गासाठी कायमच प्रेरणादायी आहे. मात्र या अभिमानास्पद परंपरेची माहिती देशवासियांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशातून स्वराज्य ध्वज यात्रेचा संकल्प केल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
भगवा ध्वज हा आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा तेजोमय साक्षीदार आहे. त्याला पाहताच मनात भक्ती,शक्ती, त्याग व शौर्याची भावना दाटून येते. विनम्रता, परमार्थ व त्याग शिकवणारा हा भगवा ध्वज महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची ओळख अवघ्या देशात ठसवणा-या भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण ही स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.
निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्यावरच स्वराज्यातील अखेरची परंतु विजयी लढाई खेळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने निजामाला मात दिली. या परिसराचे व किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे. याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. हा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज ठरणार आहे.
भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचेच स्फूर्तीस्थान आणि अभिमान आहे. अत्यंत ऊर्जादायी असा हा भगवा रंग सर्वांसाठीच सहिष्णुतेचा, समानतेचा आणि एकीचा संदेश देणारा आहे. देशाचे भवितव्य असलेल्या युवा शक्तीला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी हा ध्वज सकारात्मक विचार व प्रेरणा देईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६*६४ फूट असून वजन ९० किलो आहे. तर ध्वजस्तंभाची उंची देखील ७४ मीटर असून तो ९० टन वजनाचा आहे.
दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी ६ राज्यांतील १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.
हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/ या संकेतस्थळावर पाहाता येईल. अधिक माहितीसाठी ९६९६३३०३३० या क्रमांकावर संपर्क करा.