KINWATTODAYSNEWS

पदवीधारकांवर समाज व देशाचे ऋण फेडण्याची जबाबदारी’- न्यायाधीश पवनकुमार तापडिया

श्रीक्षेत्र माहूर :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मधील उत्तीर्ण पदवीधारकांना दि. ०८सप्टेंबर २०२१ रोजी पदवी प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना न्यायाधीश पवनकुमार तापडिया यांनी वरील उद्गार व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, “ज्याप्रमाणे घाव सोसणा-या दगडास सुंदर मूर्तीत रूपांतरित करण्याचे काम मूर्तीकार करत असतो, त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वास आकार देत असतो.”

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड होते तर सचिव सौ. संध्याताई राठोड, उपाध्यक्ष किशोर जगत , महाविद्यालय विकास समिती चे सदस्य चंद्रकांत रिठ्ठे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रफुल्ल राठोड यांनी महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवणा-या विद्यार्थ्यांचा जीवन संघर्ष आपल्या अध्यक्षीय समारोपातून व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यापीठ ध्वज व मान्यवरांची मिरवणूक काढून ,सभागृहात रीतसर ध्वज स्थापन करून , विद्यापीठ गीत गायन व वंदन करून करण्यात आली. तद्नंतर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधारकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन.जे.एम. रेड्डी यानी तर सूत्रसंचालन उपप्राचार्य तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र लोणे यांनी केले . परीक्षा विभाग प्रमुख डॉ. इक्बाल खान यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक प्रा. मोहम्मद नसीर यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

150 Views
बातमी शेअर करा