किनवट/प्रतिनिधी— सततच्या पावसाने तीन मंडळात अतिवृष्टी तर चार मंडळात दमदार पाऊस चालू असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. नदीनाले फुटण्याच्या मार्गावर असून चिबाड जमिनितील पीके वाया गेलीत. फुलात पाणी जात असल्याने कापसाचे नुकसान होत आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळीवार्यासह जोरदार पावसात कापूस आणि सोयाबीन आडवे पडले आहेत.
शिवणी, जलधरा आणि बोधडी मंडळात मागिल चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे. किनवट मंडळात अतिवृष्टीच्या जवळजवळ पाऊस पडला आहे. मांडवी, ईस्लापूर आणि दहेली मंडळात अतिवृष्टी नसली तरी दमदार व अतीजोराचा पाऊस झाला असल्याचे चित्र आहे. पर्जन्यमान टिपण्यासाठी आजपर्यंत किनवट तालुक्यातील प्रत्येक मंडळात यंत्रणा कार्यान्वित होती ती आता चक्क बंद केल्याने पर्जन्यमानाची माहिती मिळायला तयार नाही. सहायक जिल्हाधिकार्यांनी पुर्वी प्रमाणेच पर्जन्यमान यंत्र बसऊन सेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
अधूनमधून रिमझीम पाऊस चालू आहे. सोमवारी (६ सप्टेंबर) मात्र सायंकाळी वादळीवारे आणि एक तास जोराचा पाऊस तसेच रात्रभर सरीवरसरी आणि पहाटे चार वाजताचे दरम्यान झालेल्या पावसामुळे नदीनाले भरुन वाहू लागले आहेत. नेमके त्याच दरम्यान वरचा पाऊस थांबत असल्यामुळे नदीनाले फुटताफुटता अनर्थ टळू लागला आहे. परंतु सखल जमिनी चिबडल्या असून हाती पीक येऊ लागलेले वाया जात आहे. सोमवारच्या हवापाण्यामुळे कापूस व सोयाबीन बहूतांश प्रमाणात आडवी झाले आहेत. या झडीचा पावसाचे पाणी कापसाच्या फुलात जाऊन फळधारणेचे नुकसान करीत आहे. १० सप्टेंबरपर्यंत पावसाचा अनुमान असल्याने तो प्रत्यक्षात खरा ठरला तर शेतकरी पुरता हतबल झाल्याशिवाय राहाणार नाही. अतिवृष्टी झालेल्या बोधडी, जलधरा आणि शिवणी मंडळातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांनी केली आहे.
किनवट तालुक्यात सततच्या पावसाने तीन मंडळात अतिवृष्टी तर चार मंडळात दमदार पाऊस
278 Views