कंधारः-
तालुक्यातील गऊळ येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेतील बसविलेला पुतळा हटवून पोलिसांनी मातंग समाजावर अमानुष लाठीचार्ज करुन २० ते २५ जणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे माघारी घेऊन काढलेला पुतळा १७ सप्टेंबरपूर्वी सन्मानाने बसविण्यात यावा, अन्यथा कायदा व सुवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार धरून सबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशार लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
अशी आहे मागणी:-
सदरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, काढलेला पुतळा सन्मानपूर्वक प्रशासनाकडून बसविण्यात यावा, नियमबाह्य झालेल्या लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, याप्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर लाठीमार केला होता. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबधितांवर कारवाई करावी. गऊळ येथील निंदणीय घटनेस कारणीभूत असलेला समाज कंटक बाबू गिरे व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात अनुसुचित जाती-जमाती सरंक्षण कायद्याअंतर्गत व मोक्काखाली गुन्हा नोंदविण्यासाठी विशेष चौकशी करण्यात यावी.
कंधार येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परीषदेला सचिन साठे, विष्णुभाऊ कसबे, रामचंद्र भरांडे, मारोती वाडेकर, कैलास खंदारे, सचिन क्षिरसागर, दिलीप अर्जुने, रावसाहेब पवार, नागोराव कुट्टे, प्रितम गवाले, माधव डोम्पले, नागोराव आंबटवार, प्रदिप वाघमारे, सिताराम पवार, मनिष कावडे, मारोती गायकवाड, मुकिंदर कुडके, कैलास भालेराव, भंडारे, काचमोडे, भागवत डोंगरे, मालोजी वाघमारे, शिवाजी नुरूंदे यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
३१ ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील मौजे गऊळ येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या औचित्यावर ग्रामपंचायतच्या अभिलेखातील नमुना नंबर ८ (अ) वरील नियोजित जागेवर ग्रामस्थांच्या वतीने पुतळ्याच्या सरंक्षणाची हमी देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरिक्षक यांच्या समक्ष पुतळ्याच्या जागेचा असलेला वाद मिटवून ग्रामस्थांनी पुतळा बसविला. याबाबतचे शपथपत्र दोन्ही समाजाच्या स्वाक्षरीनिशी नियोजित जागेतील २० फुट जागा सोडून पुतळा बसविण्यात आला होता. त्यावेळी सर्व वाद संपुष्टात आल्याचे साठे म्हणाले. परंतु २ सप्टेंबर रोजी नांदेड येथून पोलिस प्रशासन गऊळ येथे येऊन मोठा फौजाफाट्यासह हजर झाले. सदरील पुतळा हटविण्याचा प्रयत्न करत असताना, ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली. परंतु दगडफेकीच्या नावाखाली समस्त मातंग समाजावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेत २० ते २५ मातंग समाजातील महिला व पुरूष जखमी झाले. ग्रामसेवकाला हाती धरून शासकीय कामात अडथळा प्रकरणी सुमारे ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पत्रकार परिषदेत विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी एकमुखाने ठराव घेऊन १७ सप्टेंबरपूर्वी मागण्यांना न्याय नाही मिळाल्यास मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी नांदेड येथील अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून जाब विचारणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन देण्यात आला.
मौजे गऊळ येथे प्रशासनाच्या वतीने लाठीमार करण्यात आल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यासह कोणत्याही लोकप्रतिनिधीने भेट देऊन साधी चौकशीही केली नसल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचे साठे म्हणाले.