KINWATTODAYSNEWS

किनवट शहरातील क्रीडा संकुल हे सुविधांच्या अभावाने बनले अत्यंत धोकादायक

किनवट ता प्र दि 04
तालुका क्रीडा समितीच्या नियंत्रणात असलेले किनवट शहरातील क्रीडा संकुल हे सुविधांच्या अभावाने अत्यंत धोकादायक स्वरूपाचे बनले आहे त्यामुळे एखाद्या खेळाडूला गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते किंवा जीव ही गमवावा लागु शकतो.
आमदार, सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार, तालुका क्रीडा अधिकारी व आमदार यांचे प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली असलेल्या समिती मार्फत क्रीडा संकुलाचे काम चालते व सभासदांकडून प्रतिमाह 500 रुपये एवढी फिस आकारणी करून देखील येथे सुविधांचा अभाव आहे त्यामुळे स्थानिक नगरसेवक अभय महाजन यांनी या प्रकरणी निवेदनाव्दारे खेळाडू व नागरिकांना सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे.

नांदेड जिल्ह्या पासून दीडशे किमी अंतरावर असलेले किनवट आदिवासी नक्षलग्रस्त भाग म्हणून शासन दरबारी नोंद आहे. शहरातील तालुका क्रीडाधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले बॅडमिंटन हॉल आज शोभेची वस्तू बनली आहे. यामध्ये छतावर जागोजागी पावसाचे पाणी पडून वुडन फ्लोरिंग खराब झाली आहे. तर लाईट बंद असल्याने अपुऱ्या प्रकाशामुळे खेळाडूंना बॅडमिंटन खेळणे दुरापास्त झाले आहे. याशिवाय हॉलीबॉल कोट, टेबल टेनिस तर साधे पिण्याचे पाणी ठेवण्याचे सौजन्यही तालुका क्रिडाअधिकारी दाखवत नाही. माणसांपेक्षा गाढवांचा वावर क्रिडा संकुल मध्ये वाढला असून जागोजागी त्यांची विष्ठा पडल्यामुळे शुध्द प्राणवायू ऐवजी दुर्गंधीत नागरीकांना फिरावे लागत आहे.
अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे खेळाडूंनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून लाईट लावण्याची तयारी दर्शवली असतानांसुद्धा नांदेड येथून कार्यभार पाहणारे अधिकार्‍यांमुळे यात दिरंगाई होत आहे. तेव्हा उटांवरुन बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार बंद करुन; या क्रीडा संकुलाकडे वेळीच लक्ष द्या. अन्यथा अधिक दुरावस्ता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत नगरसेवक अभय महाजन यांनी व्यक्त केले आहे.

224 Views
बातमी शेअर करा