नांदेड दि. 3 –
महाराष्ट्राचे वैभव जगभर पसरवणारे जागतिक कीर्तीचे साहित्यिक संयुक्त महाराष्ट्राचे जनक, थोर समाज सुधारक साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची शतकोत्तर जयंती महोत्सव व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना मौ. गऊळ ता. कंधार येथील अण्णाभाऊ साठे यांचा नियोजित स्मारकस्थळी बसवलेला अर्धाकृती पुतळा कंधार परिक्षेत्राचे पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी पोलीस बळाचा वापर करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची जाहीरपणे विटंबना करीत तो पुतळा स्मारकस्थळावरून काढून नेला. तद्वतच आमची प्रेरणा व अस्मिता असलेल्या महापुरूषाचा पुतळा काढू नका अशाप्रकारे विनंती करत शांततेच्या मार्गाने पुतळ्याचे संरक्षण करणारे मौ. गऊळ ता. कंधार येथील मातंग पुरूष, महिला, तरूण मुले यांना अमानुष लाठीहल्ला करू मारहाण झालेली आहे.
एवढेच नाही तर या घटनेचे वृत्त संकलनासाठी आलेल्या दै. साहित्य सम्राटचे प्रतिनिधी नितीन तलवारे व इतर पत्रकारांवरही लाठी हल्ला करीत गंभीर जखमी केले आहे.
अण्णा भाऊ साठे यांचा बसवण्यात आलेल्या पुतळ्याबाबत गावात कोणाचीही तक्रार नव्हती. गावकर्यांच्या विनंतीनुसार पुतळ्याच्या पूर्वेस असलेल्या मंदिराचा रस्ता खुला व्हावा म्हणून अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित स्मारकाच्या एकूण क्षेत्रफळातून 20 फूट क्षेत्र रस्त्यासाठी पुतळा समितीने सोडल्यानंतर गावातील लोकांमधील समज-गैरसमज, वादविवाद पूर्णपणे समाप्त झालेले होते. परंतु त्याच गावातील माजी जि.प. सदस्य बाबू गिरे पाटील या समाजकंटकाला ही बाब खटकली व त्याने जातीय द्वेषातून आणि राजकीय सुडभावनेने हा पुतळा अनाधिकृतरित्या बसवण्यात आलेला आहे तो काढावा, अशी तक्रार पोलिसांकडे देऊन राजकीय संबंधाचा गैरफायदा घेत पोलीस यंत्रणा व शासकीय यंत्रणा यांच्यावर दबाव वाढवून आणि बाबू गिरे यांच्या दबावाला बळी पडून नियोजित स्थळी बसवण्यात आलेला पुतळा पोलीस बळाचा वापर करीत अमानुषपणे निरापराध नागरिकांना, महिलांना, पत्रकारांना मारहाण करीत तो पुतळा काढण्यात आलेला आहे.
या निंदणीय घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, मानवहित लोकशाही पार्टी, भारतीय लहुजी सेना, भारतीय कम्युनिष्ट पार्टी (युनायटेड), मातंग संघ आदी सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना खालील मागण्याचे निवेदन दिले आहे.
मागण्या पुढीलप्रमाणे मौ. गऊळ येथील घटनेस जबाबदार ठरलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे, उपविभागीय अधिकारी बोरगावकर व तहसीलदार मुंढे यांना तातडीने निलंबित करून त्यांची चौकशी व या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी. या घटनेस जबाबदार असलेला समाजकंटक बाबू गिरे पाटील यांच्या विरूद्ध अॅट्रॉसिटी व मोक्का कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तातडीने अटक करावी. मौ. गऊळ येथील हटवण्यात आलेला अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी शासनामार्फत सन्मानपूर्वक बवण्यात यावा.
अन्यथा सबंध महाराष्ट्रभर मातंग समाज व बहुजन समाजातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सतीश कावडे, प्रा. सदाशिव भुयारे, उत्तम बाबळे, परमेश्वर बंडेवार, पिराजी गाडेकर, चंपतराव हातागळे, प्रा. देवीदास इंगळे, डॉ. नितीन गाडेकर, आनंद वंजारे, एन.जी. पोतरे, शिवाजी नुरूंदे, रणजीत बार्हाळीकर, अॅड. लक्ष्मीकांत दुधकावडे, विठ्ठल घाटे, गणेश मोरे, प्रदीप घाटे, डॉ. व्ही.एन. देवकांबळे, रमेश सूर्यवंशी, माधवजी वाघमारे, शिवराज दाढेल, आकाश सोनटक्के, किसन इंगळे, प्रवीण बसवंते, सतीश धनवडे, के.वाय. देवकांबळे, अविनाश आंबटवार, गोपाळ वाघमारे, प्रदीप चिंचोलीकर, रविकांत पवळे, माणिक कांबळे, शिवराज केदारे, पोचीराम केदारे, आनंद वाघमारे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.