मित्रांनो, दररोजच्या ओपीडी मध्ये पेशंट चा एक ठरलेला प्रश्न असतो. साखर खाणे चालत नाही. परंतु गुळ खाणे चालते का? किंबहुना कित्येक जण तर न विचारताच गुळाचा चहा पित असतात. त्यामुळे रुग्णांमध्ये काही गैरसमजुती आहेत याची जाणीव सदैव होत असते. याला कुठेतरी दूर करणे आवश्यक आहे हे लक्षात आल्यामुळे आजच्या लेखाचे प्रयोजन करावे लागले.
(HEALTHY NANDED निरोगी नांदेड या अभीयानात सहभागी होण्यासाठी 7796444111 हा नंबर आपल्या मोबाइल मध्ये सेव्ह करा व आपले नाव व गाव आम्हाला WHATSAPP करा)
मधुमेहींनी गुळाचा चहा प्यावा का नाही या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापुर्वी गुळ व साखर यांची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.
साखर व गुळ हे दोन्ही आपल्या दैनंदीन वापरातील पदार्थ. दोन्हीतही तोच गोडवा. मग ब-याचवेळी प्रश्न पडतो की गुळ व साखर यामध्ये काही फरक आहे का नाही ?
महाराष्ट्र हे परंपरेनुसार गुळ बनविण्यात देशातील सर्वात आघाडीवरचे राज्य. साखर तशी पाहिली तर विदेशी व गुळ स्वदेशी. गुळ व साखर दोन्हीची निर्मिती उसापासूनच. मग खरोखरच दोन्हीमध्ये फरक असणे शक्य आहे का? हे सर्व समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साखर व गुळ तयार करण्याच्या पद्धतीमधील फरक जाणून घेणे.
साखर तयार करताना चारकोलचा वापर करुन त्यातील सर्व घटक वेगळे केले जातात. साखर प्रकियेत साधारणत: 23 प्रकारच्या केमिकल्सचा वापर होतो. नंतर साखर तयार केली जाते. त्यामुळे साखरेमध्ये EMPTY CALORIES असतात. म्हणजे कुठलीही पोषक द्रव्ये साखरेमध्ये नसतात. केवळ शरीराला उर्जा देण्याचे काम साखर करते आरोग्यशास्त्राच्या नियमानुसार पोकळ पोषकत्वे असणारे साखरेसारखे पदार्थ शरीरासाठी चांगली समजले जात नाहीत.
याउलट गुळाचे आहे. गुळ तयार करताना यातील पोषकद्रव्ये वेगळी केली जात नाहीत. बहुतांशी नवीन पिढीसाठी गुळाची ओळख केवळ साखरेसाठी पर्याय अशी आहे परंतु गुळाचा अभ्यास केला तर निश्चितच यातील गुणधर्मांची ओळख पटेल.
गुळाला एक औषधी म्हणून सुद्धा महत्व आहे आणि ते परंपरेने चालत आले आहे. गुळाच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख अगदी पुरातन काळापासून सापडतो. सुश्रुत संहीतेमध्ये गुळाचे वर्णन रक्तशुद्धीकारक, अत्युच्च मुल्ये असलेला, वात व पित्त दोषांचे शमन करणारा व यकृताचे रक्षण करणारा पदार्थ असे आहे.
गुळातील पोषकद्रव्यांकडे एक नजर टाकू.
100 ग्राम गुळापासून मिळणारे घटक.
कॅलरीज – 383
सुक्रोज – 65 ते 85 ग्राम
फ्रुक्टोज व ग्लुकोज 10 ते 15 ग्राम
प्रोटीन्स 0.4 ग्राम
फॅट 0.1 ग्राम
मित्रांनो गुळात असणा-या मिनीरल्स कडेही एक नजर टाका.
साधारणत: 100 ग्राम गुळापासून आपणाला 5.5 मिलीग्राम लोह मिळते. म्हणजे शरीरासाठी लोहची जी दैनंदीन गरज आहे त्याच्या साधारणत: 30 ते 40 टक्के गरज 100 ग्राम गुळापासून पूर्ण होते.
लोह या मिनिरल शिवाय गुळात मँगॅनीज 10 ते 20 टक्के, मॅग्नेशियम 20 टक्के तसेच पोटॅशिअम साधारणत: 30 टक्के असते. यासोबतच गुळापासून थोड्या प्रमाणात बी काँम्प्लेक्स तसेच कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस व कॉपर ही मूलद्रव्येही मिळतात.
मित्रांनो आजकाल गुळाला आकर्षक करण्यासाठी काही रसायनांचा वापर केला जातो. रसायनविरहीत गुळ काळा दिसतो. बाजारात आकर्षक रंगाचा गुळ दिसला तर ओळखावे की त्यात रसायने मिसळली आहेत.
वरील सर्व माहिती वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेच असेल आपल्या तब्येतीसाठी साखरेपेक्षा गुळ हाच चांगला आहे. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. जेवढा जास्त गुळ आपल्या आहारात तेवढ्याच अतीरिक्त कॅलरीज आपण घेणार व त्यामुळे आपले वजन वाढून लठ्ठपणामुळे होणारे डायबेटीस व रक्तदाबासारखे आजार वाढण्याची शक्यता जास्त.
त्यामुळे दैनंदीन जीवनात गुळाचा वापर सुद्धा मर्यादीतच असावा.
वजन जास्त असणाऱ्या लोकांनी रक्तवाढीसाठी गुळशेंगदाने पेक्षा हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा.
(HEALTHY NANDED निरोगी नांदेड या अभीयानात सहभागी होण्यासाठी 7796444111 हा नंबर आपल्या मोबाइल मध्ये सेव्ह करा व आपले नाव व गाव आम्हाला WHATSAPP करा)
मधुमेह नसणाऱ्यांसाठी साखरे पेक्षा गुळ चांगला आहेच हे स्पष्ट झाले आहे परंतु मुख्य प्रश्न आहे की मधुमेह असणाऱ्यांसाठी गुळ खाणे योग्य आहे का नाही.
मित्रांनो साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स 100 आहे. परंतु गुळाचा
ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा 84 आहे.तो काही साखरेपेक्षा फार कमी नाही.
मधुमेही किंवा वजन प्रमाणाबाहेर असलेल्या लोकांनी कमी glycemic इंडेक्स असलेले अन्नपदार्थ खावेत. गुळाचा glycemic index जास्त असल्याकारणाने मधुमेह असणाऱ्यांनी गुळ खाणे किंवा गुळाचा चहा पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
मित्रांनो गुळामध्ये पोटॅशियमचेही थोडे प्रमाण असते. ज्यांना मधुमेह नाही व केवळ रक्तदाब आहे त्या लोकांनी चहा मध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. परंतु गुळाचे अति प्रमाण टाळावे अन्यथा या सर्व आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
निष्कर्ष –
1 – मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळ व साखर हे दोन्ही पदार्थ वाईट आहेत. शरीरासाठी चांगले नाहीत. त्यामुळे डायबेटिसच्या रुग्णांनी गुळाचा चहा पिणे सर्वतः चुकीचे आहे.
2 – ज्या रुग्णांना केवळ रक्तदाब आहे परंतु मधुमेह नाही अशा रुग्णांनी साखरेचा चहा घेण्याऐवजी गुळाचा चहा घ्यावा. परंतु गुळाचा अतीवापर वजन वाढवून घातक ठरू शकतो.
3 – सर्वसाधारण निरोगी लोकांनी साखरे ऐवजी गुळाचा वापर करावा.
4 – लहान मुलांसाठी गुळ खाणे हे अतिशय चांगले असते. त्यामुळे लहान मुलांमध्ये रक्त वाढण्यास मदत होते.
5 – बधकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी साखरेऐवजी गुळाचा वापर करावा.
मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा.पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिले तर साखर कारखाने हे पर्यावरणाला हानी पोहोचवतात. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी साखर बंद करुन गुळाला प्राधान्य दिले तर साखरेचे राजकारण करणा-यांना निश्चितच चाप बसेल. बाजारातील साखरेची मागणीच घटली तर साखर कारखान्यावर अवलंबून न राहिल्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल व समाजाचे व देशाचे आरोग्य सुधारण्यास निश्चितच मदत होईल.
धन्यवाद
आपलाच –
डॉ.महेश प्र.तळेगावकर,
मधुमेह तज्ञ, नांदेड
(HEALTHY NANDED निरोगी नांदेड या अभीयानात सहभागी होण्यासाठी 7796444111 हा नंबर आपल्या मोबाइल मध्ये सेव्ह करा व आपले नाव व गाव आम्हाला WHATSAPP करा)