किनवट/प्रतिनिधी- तालुक्यातील मौजे कोठारी ( चि.) ग्रामपंचायत हद्दीतील शेत सर्वे नंबर ५२ मधील शेत मालकांनी केवळ ८८ आर सामायिक क्षेत्र असताना सर्व नियम धाब्यावर बसवून खाजगी ले-आऊट तयार करून ८५ प्लॉट नियमबाह्य विक्री करत शासनाची व प्लॉट धारकांची फसवणूक करत असलेल्या लेआउट धारकांवर दखलपात्र गुन्हा नोंद करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण (बाबु) नेम्मानीवार यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या तक्रारी निवेदनात नमूद असे की, मौजे कोठारी (चि.) हद्दीतील शेत सर्वे नं. ५२ मध्ये शेख निसार शेख हुसेन आणि शिवराज सिद्रामप्पा चिल्लरगे या दोघांच्या नावे सामायिक क्षेत्र म्हणून ५५ आर जमीन आहे. तर याच शेत सर्वे नं. मध्ये अंजुमराणा अ. हन्नान यांचे नावे ३३ आर क्षेत्राची सातबारा वर नोंद असताना शेख निसार शेख हुसेन यांनी सदर क्षेत्रात नियमबाह्य रित्या स्थानिक ग्रामपंचायतीला हाताशी धरून विनाअकृषिक, नगररचना विभागाची परवानगी न घेता खाजगी लेआऊट मंजूर करून घेऊन ग्रामपंचायत दप्तरी मालकी नोंद करून मालकी, नमुना नंबर ८ व गावठाण प्रमाणपत्र आधारे नियमबाह्य दस्त नोंदणी करून प्लाट धारकांची फसवणूक व शासनाची कोट्यवधीचा महसूल बुडविल्याचा आरोप केला आहे.
तर सदर मालकी जमीन क्षेत्र केवळ ८८ आर जमीन असताना बाराशे चौरस फूट क्षेत्राचे ८५ प्लॉट कसे तयार होतात हा प्रश्न उपस्थित करून खाजगी ले -आउट नकाशाप्रमाणे तयार केलेल्या एकूण प्लॉटिंगचे क्षेत्र ३ एकर २ गुंट्टे इतके दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे ८८ आर क्षेत्रापैकी अधिकची शेतजमीन क्षेत्राचा लेआउट कसा मंजूर झाला व ८५ प्लॉट तयार करून बेकायदेशीर कसे? विक्री केले या सर्व गंभीर बाबींची सखोल चौकशी करून या अवैध प्लॉटिंग विक्रीत सहभागी असणार्यांवर तात्काळ दखलपात्र गुन्हे नोंद करण्याची मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून नारायण (बाबू) नेम्मानीवार यांनी केली आहे.