KINWATTODAYSNEWS

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत संगणक प्रशिक्षणासाठी व सॉफ्टवेअर निर्मिती चे लाइव्ह प्रशिक्षण घेण्यासाठी सेटट्राइब हा एक महत्वाचा प्लॅटफॉर्म -जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर

किनवट दि. (तालुका प्रतिनिधी) : माहिती तंत्रज्ञानाचं जग वेगाने पुढे जात असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात निष्णात झाला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. सेटट्राइबच्या माध्यमातून केवळ संगणकाचे केवळ पारंपारिक प्रशिक्षण न देता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कोडींग, नवनवीन येणारे तंत्रज्ञान ह्याबाबतचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत संगणक प्रशिक्षणासाठी व सॉफ्टवेअर निर्मिती चे लाइव्ह प्रशिक्षण घेण्यासाठी सेटट्राइब हा एक महत्वाचा प्लॅटफॉर्म झाला आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विपीन इटनकर (भाप्रसे) ह्यांनी केले. माहूर – किनवटच्या त्यांच्या धावत्या दौर्‍यात किनवटस्थित सेटट्राइब ह्या संगणक प्रशिक्षण व आयटी संस्थेला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांच्या सोबत किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकीरण पुजार (भाप्रसे) आणि प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी श्री कार्तिक (भाप्रसे) उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री इटनकर म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची सुसज्ज अशी संगणक लॅब, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी किनवट मध्येच मिळत असेल तर विद्यार्थ्यांसाठी ही एक खूप मोठी संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासाठी लागणार्‍या काही सॉफ्टवेअरची निर्मिती करण्याची संधी सेटट्राइबच्या विद्यार्थ्यांना देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व प्रकल्प कार्यालयामार्फत ह्या विद्यार्थ्यांना व संस्थेला सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन केले जाईल व विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. सौरभ रापनवार, मयुरेश भगत, यश गोटे, शबाना खान, सृष्टी काशेटवार, श्रेयस माडपेल्लीवार ह्या प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या चमुचे कौतूक करून त्यांनी भविष्यात अधिकाधिक मेहनत करून उज्वल भविष्याचा पाया रचण्याचा सल्ला दिला.

कोव्हिड नियमांचे पालन करून सेटट्राइबचे संचालक सारंग वाकोडीकर, रागिणी वाकोडीकर, मेहेरकुमार उपलेंचवार ह्यांच्यासह निवडक प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर, पत्रकार प्रमोद पोहरकर ह्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ह्या कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी श्री कीर्तिकीरण पुजार ह्यांनी सेटट्राइब च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व प्रकल्प कार्यालयात आस्थापित झालेल्या विविध सॉफ्टवेअर बद्दल जिल्हाधिकार्‍यांना माहिती देवून विद्यार्थ्यांचे कौतूक केले व सेटट्राइबच्या नावाला अनुसरून ट्रायबल (ग्रामीण / मागास) भागातील असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य सेटट्राइबमार्फत घडवले जाईल असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान झालेल्या भेटीत जिल्हाधिकारी इटनकर ह्यांनी सेटट्राइबला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती व आठवडाभराच्या आतच त्यांनी भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने आमच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले आहे त्याबरोबरच संगणक प्रशिक्षण व सॉफ्टवेअर निर्मीती क्षेत्रात भविष्यात आणखी चांगले, दर्जेदार काम करण्याची जवाबदारी सेटट्राइबवर असल्याचे संचालक सारंग वाकोडीकर ह्यांनी सांगितले.

81 Views
बातमी शेअर करा