उदगीर : उदगीर येथील पत्रकार भवनाची जागा त्वरित ताब्यात द्यावी अन्यथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी, नगर परिषद उदगीर यांना नुकतेच देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षापासून उदगीर तालुक्यातील पत्रकारांना पत्रकार भवन बांधण्यासाठी जागा देण्याचे मंजूर केले आहे पण अद्यापही ती जागा देण्यास तयार नाहीत त्यामुळे पत्रकार भवन बांधण्याचे स्वप्न वरच्यावर लांबत चालले आहे. येत्या २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत नियोजित जागा पत्रकारांना ताब्यात दिली नाही तर दिनांक २३ ऑगस्ट २०२१ पासून उदगीर नगरपरिषदेसमोर संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनंत पाटील, लातूर जिल्हा सरचिटणीस अर्जुन जाधव, लातूर जिल्हा कायदेविषयक सल्लागार ॲड. श्रावण माने, उदगीर तालुका अध्यक्ष नागनाथ गुट्टे, उदगीर शहर अध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, उदगीर तालुका युवा अध्यक्ष, शेख अझरुद्दीन, पदाधिकारी अंबादास उखाणे, अनिल जाधव आदी पदाधिकार्यांच्या सह्या आहेत. सदर निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर व पोलीस स्टेशन, उदगीर यांना देण्यात आले आहे. उदगीरच्या पत्रकार भवनाची जागा पत्रकारांचे ताब्यात देण्यास विलंब केल्यास मंत्रालयाकडे पाठपुरावा करू असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले आहे.