अकोला: जिल्ह्यातील श्री.मखराम पवार हे अचानक चर्चेत आले १९९० मध्ये! विक्रीकर उपायुक्त पदाचा राजीनामा देऊन ते थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले! मतदार संघ मूर्तीजापूर आणि निवडणुकीचं चिन्ह होतं,दोन पान!
शासकीय सेवेत असले तरी त्यांना चळवळीची पार्श्वभूमी होती.पुसदच्या फुलसिंग नाईक महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आपोआप चळवळीकडे ओढले गेले.शिक्षणात कमालीची गती असल्याने वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेत ते पहिल्या तीनमध्ये हमखास असायचे..!
साठच्या दशकात पदवीधर झाले आणि लोकसेवा अयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन विक्रीकर विभागात राजपत्रित अधिकारी झाले.त्यांचा पिंड समाजसेवेचे असल्याने तेथेही चळवळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती .नोकरी सांभाळून विद्यार्थ्यांना सतत मदत करीत राहायचे..सामाजिक संघटनेत ते सक्रीय आसायचे.नोकरीत राहून आपण समाजाचे काम पाहिजे तसे करू शकणार नाही.राजकारण हेच समाजाला न्याय देण्याचे साधन आहे,अशी त्यांची पक्की भावना झाली आणि एक मेठा धाडसी निर्णय घेतला,नोकरीचा राजीनामा देण्याचा! निर्णय अनेकांना पटला नाही.आणखी १५ वर्षे सेवा बाकी होती.पण ते आपल्या मतावर ठाम होते.अॕड.प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षांचा त्यांना पाठिंबा होताच..बाळासाहेब हे त्यांच्यासाठी मतदारसंघात आले होते.त्यांचा स्वतःचा संपर्कही दांडगा होताच .परिणामी ते चांगल्या मताने निवडून आले.
विधानसभेतील अभ्यासपूर्ण भाषणामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.वंजारी-बंजारी एकच असल्याच्या प्रकरणावर ते सरकारवर तुटून पडले.शेवटी तो प्रश्न धसास लावण्यात ते यशस्वी झाले.१९९४ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी गोवारी हत्याकांड झाले, चेंगराचेंगरीत अनेक लोक बळी गेले.त्यावेळी तर ते विधिमंळात सरकारला चांगले धारेवर धरून सळोकीपळो करुन सोडले आणि त्या निषेधार्थ त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीना दिला होता!
त्या पाच वर्षात त्यांनी सत्ताधारी पक्षाचा चांगलाच घाम फोडला.विविध आयुधं वापरत ते लोकांचे प्रश्न सोडवित होते,तर दुसरीकडे पक्ष बांधणी करीत होते.
*बहुजन महासंघाचा जन्म*
कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टी स्थापन करुन उत्तर प्रदेशात प्रस्थापितांना हादरे देण्यास सुरूवात केली होती.त्या धर्तीवर महाराष्ट्रात आपण का प्रयोग करु नये? या विचारातुन त्यांनी बहुजन महासंघाला जन्म घातला.अर्थात बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने!
१९९२ -९४ या दोनच वर्षात बहुजन महासंघ गावोगावी पोहचला.रात्रंदिवस एक करीत त्यांनी खूप दौरे केले.अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाला घवघवीत यश मिळाले.अकोला पॕटर्नची राज्यभर चर्चा सुरू झाली.१९९३ मध्ये तर किनवटची विधानसभा पोट निवडणूक बहुजन महासंघाने जिंकली सुध्दा ! त्यामुळे प्रस्थापित मंडळी हादरली.परिणामी काँग्रेससमोर त्यांनी पर्याय निर्माण केला.बहुतांशी नेते मंडळी बहुजन महासंघाकडे आकृष्ट होऊ लागली.महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठमोठया सभा होऊ लागल्या.१९९५ च्या विधान सभा निवडणुकीत त्यांचे अनेक उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.त्याआधी १९९४ मध्ये बारामती व अहमदनगरची लोकसभा पोट निवडणूक भारिप- बहुजन महासंघाने लढविली नसती तर नंतरच्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच त्यांचे २०-२५ आमदार निवडून आले असते.त्याच दरम्यान आपण ज्या उमेदवाराला मोठ्या मेहनतीने निवडून आणले,ते श्री.भीमराव केराम हे श्री.शरद पवार यांच्या गळाला कधी लागले हे मखराम पवार व बाळासाहेब आंबेडकर यांना कळलेच नाही.हा धक्का सुध्दा त्यांच्यासाठी मोठा होता.
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी तिसरा पर्याय काँग्रेस समोर उभा केला आणि अनेक मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांना दुसऱ्या-तिस-या क्रमांकाची मते मिळाली होती .
नंतर १९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात ते कॕबिनेट मंत्री झाले.मात्र दोनच वर्षात बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि ते बाहेर पडले.त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.दिग्रस येथे बंजारा समाजाच्या अधिवेशनासाठी श्रीमती सोनिया गांधीना त्यांनी आणले.मात्र काँग्रेसने त्यांचे पूनर्वसन केले नाही .२००५ नंतर ते राजकारणापासून थोडे दुर झाले.
मात्र नव्वदचं दशक त्यांनी दणाणून सोडलं.प्रस्थापित नेत्यांवर तीव्र शब्दांत प्रहार करायचे.कोणाचाही मुलाहिजा करायचे नाही.महाराष्ट्रातील कांही घराणीच कित्येक वर्षांपासून राज्य करीत आहे.गरीब माणसाला स्थान का नाही ? असे थेट प्रश्न ते विचारायचे!१९९६ ची लोकसभा तर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री श्री.सुधाकर नाईक यांच्या विरोधातच वाशीममधून लढवली होती.एक लाखापेक्षा अधिक मते त्यांनी घेतली.
अमोघ वक्तृत्व,उत्कृष्ट भाषा शैली,विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी,यामुळे सभागृहात आणि सभागृहाबाहेर एक वेगळी छाप त्यांनी सोडली.
८ आॕगस्ट रोजी मुंबईत लिलावती हाॕस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुःखद निधन झाल्याची बातमी कळली.एक लढवय्या व प्रस्थापितांना हादरा देणाऱ्या नेत्याला आपण मुकलो,अशीच भावना माझी होती.एक शासकीय अधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात आपलं वेगळ अस्तित्व व स्थान निर्माण करु शकतो,हे त्यांच्या रुपाने महाराष्ट्रातला पाहायला मिळाले.त्यांच्या कार्य-कर्तृत्वाची दखल राजकीय अभ्यासकाला घ्यावीच लागेल.त्यांच्या आत्म्यास शांती मिळो,ही प्रार्थना..माझी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली..
*मोहन राठोड,पुणे*