KINWATTODAYSNEWS

तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी खेचून आणेल -आमदार भीमराव केराम

किनवट : तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी खेचून आणेल. परंतु त्याहीपेक्षा उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करून बीओटी तत्वावर व्यापारी गाळे निर्मितीतून स्वउत्पन्न मिळवून तालुका क्रीडा संकुलास स्वयंपूर्ण करण्याला माझा अग्रक्रम राहील. तसेच भविष्यात किनवट जिल्हा होणार असल्याने जिल्हा क्रीडा संकुल निर्माण करण्यासाठी 12 हेक्टर जागा नगरपरिषदेच्या प्रारूप विकास योजना (दुसरी सुधारीत ) मध्ये आरक्षित करून घेणार आहे.शासनाच्या विचाराधीन असलेली तालुका क्रीडा संकुल योजना एक कोटी वरून पाच कोटी करण्यासाठी पाठपुरावा करेन, असे प्रतिपादन तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम यांनी केले.
मंगळवार (दि. 3 रोजी ) तालुका क्रीडा संकुल इनडोअर हॉल येथे आयोजित केलेल्या बैठकीचा अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, नायब तहसीलदार अनिता कोलगने, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, पं.स.सदस्य नीलकंठ कातले, सहायक गट विकास अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक मारोती थोरात, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही. डी. फसले, नगर रचनाकार राहुल निकम, उत्तम कानिंदे, आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे, क्रीडा शिक्षक जुम्माखान पठाण, संदीप यशीमोड, सय्यद फरहान, राजू महले आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका क्रीडा अधिकारी गुरदीपसिंघ संधू यांनी सूत्रसंचालन केले.
एक कोटी रुपये खर्चून उपलब्ध केलेल्या सुविधा अधिकारी कर्मचारी, खेळाडू, ज्येष्ठ नागरीक व व्यापारी यांना नाममात्र शुल्क आकारून देणे, क्रीडांगण विकास योजना (आदिवासी ) अंतर्गत मंजूर असलेला चौदा लाख रुपयाचा 200 मीटर धावनपथ पूर्ण करणे, सोलार सिस्टीम सौर विद्युत संच (ऑनग्रीड ) बसविणे, इनडोअर हॉल वुडन फ्लोरींग दुरुस्ती व नवीन एल.ई.डी. फोकस लाईट बसविणे, व्हॉलीबॉल मैदानास लोखंडी जाळी बसविणे, कार्यालयीन आवश्यक साहित्य खरेदी व कर्मचारी मानधन अदा करणे या महत्वपूर्ण विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर सर्वांनी बॅडमिंटन हॉल आणि व्यायाम शाळेची पाहणी केली.

251 Views
बातमी शेअर करा