साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती, प्रचंड दारिद्रय, गौरवशाली परंपरा नसताना मराठी साहित्य विश्वात डोळे दिपवणारी प्रतिभेची उत्तुंग अशी भरारी घेतली. साहित्याची निर्मिती करताना काल्पनिक पंख त्यांनी कधी लावले नाहीत. जसे जगले, अनुभवले, तेच वास्तव साहित्यात साकारले. जाती-पातीच्या जंजाळात ते गुरफटून गेले नाहीत. उलट जातीपातीचे घट्ट व मजबूत असलेले वर्तुळाला त्यांनी छेद दिला. वंचित, उपेक्षित, भटके-विमुक्तांच्या प्रश्रांची उकल होण्यासाठी त्यांनी आपली लेखनी उपयोगात आणली. सामान्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे. त्यांच्यात जागृती होऊन सामाजिक क्रांतीसाठी ते सिद्ध व्हावेत. म्हणून वंचित, उपेक्षित, शोषितांचा आवाज बुलंद केला.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊंचा जन्म वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे झाला. शालेय शिक्षण झाले नसले, तरी ते प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञानातून साहित्य सम्राट झाले. वडिलांसोबत १९३२ ला मुंबईला आल्यानंतर रोजीरोटीचा प्रश्न जटील व गुंतागुंतीचा होता. त्यामुळे हाताला मिळेल ते काम त्यांनी केले. कामगार म्हणून काम करत असताना कामगारांचे दारिद्रय, हालअपेष्टा जवळून पहाता आले. कामगारांचे हलाखीचे जीवनमान पाहून त्यांची घालमेल झाली. मुंबईत भांडवलदारांची मग्रुरी, शोषण, श्रीमंतीचा बडेजाव जसा पाहिला. तसाच दुसरीकडे सामान्य माणसांचे दारिद्रय, गरीबी, श्रम आदी पाहिले. सुखाची निर्मिती घामातून होऊनही तेच उपासपोटी राहतात. त्यामुळे परस्परविरोधी चित्र अण्णाभाऊंनी काव्यातून उजागर केले.
आपल्या कथेत गावकुसाबाहेर असलेल्या सामान्य, उपेक्षित, वंचितांना त्यांनी नायकत्व प्रदान केले. नायक-नायिका बिकट परिस्थिती समोर हतबल न होता झुंजार लढवय्या असल्याच्या दिसतात. त्यांनी जगणे, मरणे, झुंज देणे यावर लेखन केले. ‘स्मशानातील सोनं ‘,’वळण ‘, ‘सापळा’, ‘सोन्याचा मणी’, ‘सूड’,’मरीआईचा गाडा’ आदींसह विविध कथातून अण्णाभाऊंनी सामान्य, उपेक्षित, वंचित समुहाला आत्मभान, स्वत्व जागृत केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधनात्मक चळवळीचा प्रभाव अण्णाभाऊंच्या कथेतून स्पष्टपणे दिसून येतो. डॉ. बाबासाहेबांनी वंचित समाजाला आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. वंचितांचा दाबलेला आवाज प्रस्थापित साहित्यात दिसला नाही. अण्णाभाऊंंनी तो कथेच्या माध्यमातून समोर आणला. कथेतील सर्व माणसे अन्यायाविरुद्ध लढणारी, लढाईच्या मैदानात हार न मानणारी आहेत. अण्णाभाऊंच्या कथेविषयी प्र.के.अत्रे यांनी ‘जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांची कथा’ असे संबोधले.
कादंबरी कमी प्रबोधन व रंजनाचे साधन म्हणून पाहिले जात होते. मध्यमवर्गीय समाजातील जीवन जाणिवांचे रेखाटन त्यात अधिक होते. परंतु अण्णाभाऊंंनी व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून जे जग पाहिले, अनुभवले, पाहिलेल्या माणसाच्या सुख-दुःखाशी समरस होऊन कादंबरीची निर्मिती केली. परंपरागत विषयापेक्षा, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, पिडीत, भटके विमुक्त, आदिवासी आदींचे वास्तव जीवन त्यांनी कादंबरीत आणले. पुरूषांचा स्वाभिमान, स्त्रीचे चारित्र्य व देशाचे स्वातंत्र्य याचे रक्षण करणे. असा उदात्त हेतू साहित्य लिहिण्यामागे होता.
——————————————————-
प्रो.डॉ.गंगाधर तोगरे
राजगड, कंधार.जि.नांदेड
मो. ९४२३६५६३४५
—————————————————-
अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायक-नायिका स्वातंत्र्य, समता, मानवता, न्याय, मानवी मूल्ये आदींसाठी संघर्ष करताना दिसतात. आर्थिक कुचंबणेने, सामाजिक अप्रतिष्ठा, अन्याय-अत्याचारांने क्षती पोहचलेल्या असल्या, तरी माणुसकी, मानवी मुल्यांची जपणूक करणारी आणि परिवर्तनावर अढळ निष्ठा बाळगणाऱ्या आहेत. कल्पनेचे पंख लावून आकाशात भरारी न मारता भोगलेल्या वास्तविक जीवनाची डोळस दृष्टी देणाऱ्या व्यक्तीरेखा कादंबरीत साकारल्या आहेत. त्या सामाजिक परिवर्तनाच्या लढयासाठी मौलिक आहेत. नायक क्रांतिकारक, पराक्रमी, धाडसी, बंडखोर आहेत. समाज परिवर्तनासाठी लढणारे आहेत.
अण्णाभाऊंचा १९४२ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सहभाग लक्षवेधी असा होता. अण्णाभाऊंनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) पहिली कादंबरी असून फकिरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. उपेक्षित, गुन्हेगार , कलंकित ठरवले गेलेले, मागासवर्गीय, श्रमिक, भटके विमुक्तांच्या सुख व समृद्धीचे स्वप्न अण्णाभाऊंनी पाहिले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे लढाऊ विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रूजले होते. म्हणून ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हा प्रेरणादायी विचार खूपच गाजला. त्यांची निरीक्षणशक्ती अतिशय सूक्ष्म होती. १३ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, नाटक, पोवाडे, शाहिरी, प्रवासवर्णन आदी विपुल ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. अण्णाभाऊंच्या साहित्यात शोषण व व्यवस्थे विरूद्धचा संघर्ष हा न्याय आणि सन्मानासाठी आहे. संघर्षा शिवाय समाज परिवर्तन होत नाही. अशी कणखर भूमिका प्रभावीपणे मांडला. अण्णाभाऊ उपेक्षित, श्रमिक, शोषित, भटके-विमुक्ताचा आवाज आहेत. त्यांनी दिलेल्या साहित्यरूपी आयुधाचा यथायोग्य वापर सामाजिक संघटना, अण्णाभाऊंच्या अनुयायांनी करावा. तेच अण्णाभाऊंंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ठरेल.