KINWATTODAYSNEWS

परभणी घटनेची न्यायिक आयोगामार्फत चौकशी करावी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाची मागणी

नांदेड दि. 19 –
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करणारी घटना व या विटंबना घटनेचा संविधानिक मार्गाने डॉ. आंबेडकर अनुयायांकडून व संविधानवादी जनतेकडून निषेध व्यक्त करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनाच लक्ष करीत पोलीस यंत्रणेकडून कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो जणांना अमानुष मारहाण करणे व निरापराध शेकडो आंबेडकर अनुयायांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करीत त्यांना न्यायालयीन कोठडीत डांबून अमानुष मारहाण करणे या घटना निषेधार्ह असून या घटनाक्रमात न्यायालयीन कोठडीतील कायद्याचे शिक्षण घेणार्‍या सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू नव्हे तर पोलीस यंत्रणेने घेतलेला सोमनाथ सूर्यवंशी या युवक भीमसैनिकाचा बळी या निंदणीय घअनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक आयोगामार्फत चौकशी पूर्ण करावी व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत नव्हे तर जबाबदार ठरलेल्या पोलीस प्रशासनाविरूद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, अ.भा. गुरू रविदास समता परिषद व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परभणी पोलिसांनी बेकायदेशीरपणे परभणी शहरातील दलित वस्त्यांना लक्ष करीत धरपकड व अमानुष मारहाण करीत झालेल्या अटकसत्रात अनेक निरपराध आंबेडकर अनुयायी हे भरडून काढले. पोलीस यंत्रणेच्या बेकायदेशीर व अत्याचार करणार्‍या कार्यपद्धतीमुळेच सोमनाथ सूर्यवंशी या तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू आणि 10 डिसेंबरपासून सुरू झालेल्या घटनांचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले असता, शासकीय प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांनी केलेल्या कार्यवाही पाहता अनेकांकडून संशयच व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे तर सरकारी दहशतवादच होता याची खात्री होते, म्हणूनच परभणी येथील प्रकरणाची व घटनाक्रमाची न्यायालयीन व निःपक्षपातीपणे चौकशी झाल्याशिवाय सत्य व वस्तुस्थिती समोर येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 कोटी रूपयांची मदत करावी, त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. तसेच हिंसाचारातील नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करावी, अपराध व्यक्ती विरूद्ध दाखल केलेले गुन्हे रद्द करावे व कायदा सुव्यवस्था हाताळण्यास बेजबाबदार व्यहार करणार्‍या प्रशासनाविरूद्ध व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या पोलीस अधिकारी यांच्याविरूद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे व अ.भा. गुरू रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात विनायक सूर्यवंशी (मुंबई), एन.डी. रोडे, शिवाजीराव सोनटक्के, गंगाधर वाघमारे, यू.एन. वाढवे, आनंद वंजारे, नागेश तादलापूरकर, प्रभाकर बाराव, संजय गायकवाड, श्रीनिवास कांबळे, व्यंकटराव इळेगावकर, बालाजी पाटील, बालाजी गऊळकर, वाय.जी. वाघमारे, यनवळ एस.एन., माळेगावकर हनुमंत, रमेश गायकवाड, गंगाधर खुने, दिगांबर सोनकांबळे, शंकरराव गायकवाड, उत्तमराव वाघमारे, गोपीनाथ सूर्यवंशी, प्रा. प्रबुद्ध चित्ते, इंजि. एस.पी. राके, महादेव कसबे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————

188 Views
बातमी शेअर करा