नांदेड : नुकत्याच सार्वत्रिक विधानसभा निवडणुका होऊन राज्यात भाजपचे सरकार आरुढ होते न होते की लगेच परभणी शहरात भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना होऊन दंगल होणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी खेदजनक बाब आहे.
ज्यांनी हे कृत्य केले त्या आरोपी विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी.हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून पोलिसांनी सूडाच्या भावनेने न वागता शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे.
परंतु उलट श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे कायद्याचे तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी यास जमानत झालेली असतांनाही त्याचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू होणे ही अतिशय संतापजनक घटना असून अत्यंत वेदनादायी आहे.
या मृत्यू प्रकरणी तातडीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशी च्या पालकांना रुपये ५० लाखांची मदत करावी व त्याच्या घरातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी दिली पाहिजे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सचिमंडळ सदस्य व मराठवाडा निमंत्रक कॉ.विजय गाभने यांनी केली आहे.
१० डिसेंबर रोजी परभणी येथे अनुचित घटना घडल्या बरोबर दिनांक १२ डिसेंबर रोजी पक्षाच्या नांदेड तालुका कमिटीच्या वतीने अभिजीत राऊत (भा.प्र.से.)जिल्हाधिकारी नांदेड यांना प्रत्यक्षात भेटून पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधान प्रतिकृतीची नासधूस करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली असून नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
अशी माहिती माकप नांदेड तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.
======