*सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आठ दिवसानंतरही मुख्य आरोपीला अटक नाही हे महायुती सरकारचे अपयश.*
*बीड व परभणी प्रकरणी संसदेत आवाज, जनतेच्या असंतोषाची दखल सरकारने घ्यावी.*
नवी दिल्ली, दि. १७ डिसेंबर
परभणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालून संविधानाची विटंबना करण्यावर त्वरीत कठोर कारवाई केली असती तर पुढच्या घटना घडल्या नसत्या. पण त्यावेळी सत्ताधारी लोक मंत्रिमंडळ बनवण्यात व्यस्त होते त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. जनतेत असलेला असंतोष थांबवण्याची जबाबदारी सरकारची असून भाजपा युती सरकाने परभणी प्रकरण गांभिर्याने घेऊन दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे.
परभणी व बीड प्रकरणी संसदेतही आवाज उठवण्यात आला. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अटक केलेली नाही. महायुती सरकारच्या या अपयशावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, परभणी पोलिसांनी अनेक निरपराध व्यक्तींना जेलमध्ये टाकले. जे लोक याप्रकरणी आवाज उठवत होते त्यांचा आवाज दडपण्याचे काम पोलीसांनी केले आहे. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुर्यवंशी यांना मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी विजय वाकोडे हे पाच सहा दिवसापासून शांततेने या प्रकरणी काम करत होते, त्यांचा ह्रदय विकाराने मृत्यू झाला. परभणी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी व सोमनाथ सुर्यंवशी यांच्या कुटुंबाला सरकारने २५ लाख रुपयांची मदत करावी याचा वर्षाताई गायकवाड यांनी पुनरुच्चार केला. पोलिसांनी निरपराध लोकांना अटक करु नये, जनतेने शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
*सुरेशचंद्र राजहंस,*
*काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक.*
*मोबाईल नंबर – 9930151918*