KINWATTODAYSNEWS

“हॅलो मतदार भाऊ… मतदानाला गावाकडं या…” किनवटमध्ये सीमावर्ती स्थलांतरीत मजूरांना साद 

किनवट : पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकंती करणाऱ्या मतदारांच्या सीमावर्ती गावात जाऊन स्वीपच्या वतीने ” हॅलो मतदार भाऊ… मतदानाला गावाकडं या.. ” अशी साद घालत घरोघरी जाऊन मतदार जनजागृती करण्यात येत आहे.
     लोकसभा निवडणूकीत काही गावात 50% पेक्षा कमी मतदान होण्यास  मजूरांचे सीमावर्ती राज्यात स्थलांतर हेही एक कारण असल्याने सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी तेलंगाणा सिमेलगतच्या गावात जाऊन मतदार जनजागृती करण्याचा उपक्रम सूचविला.
     त्यानुषंगाने गट शिक्षणाधिकारी तथा स्वीपकक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वात स्वीप कक्षाचे सर्व सदस्य सीमावर्ती भागातील आंदबोरी (ई), चिखली(ई), मार्लागुंडा, कंचली , मलकजांब, गोंडजेवली,  दयाळधानोरा व तांडा, भीमपूर, अंबाडी, अंबाडी तांडा, सिडामखेडा, भिलगाव, तलाईगुडा, मिनकी आदि गावात जाऊन घरोघरी भेट देऊन मतदार जनजागृती करीत आहेत. कुलूप बंद घराच्या शेजाऱ्यांकडून कामासाठी राज्यसिमेबाहेर गेलेल्या मतदारांचा भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन ” हॅलो मतदार भाऊ … 20 नोव्हेंबरला कुटूंबातील सर्व मतदारांसह मतदानाला गावाकडं या…” त्यांचेशी असा संवाद साधत आहेत.
     स्वीप कक्ष सदस्य तथा केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे, शाहीर प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी , प्रसिद्ध गायक सुरेश पाटील ,गीतकार रुपेश मुनेश्वर, रमेश मुनेश्वर, भूमय्या इंदूरवार,  शेषराव पाटील , ढोलकी सम्राट सूरज पाटील, मल्लीकार्जून स्वामी, सारंग घुले, आकाश बोलेनवार, रंजना पोटे हे गावोगावी जाऊन विविध भाषेतून गीत गायन व संवाद साधून सर्वांकडून ” मी मतदान करणारच ” अशी शपथ घेऊन जनजागृती करीत आहेत.
       

70 Views
बातमी शेअर करा