KINWATTODAYSNEWS

गोंडी व बंजारी भाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप किनवटची मतदार जनजागृती

किनवट : ” लोकशाहीत पक्का किकाने , मतदान कियेल दाकाने ” (गोंडी) ,”याडी मतदान करेरो, बापू मतदान करेरो. ..” (बंजारी) , “अम्मा अक्का इडकी रवनली मतदान चेऊ उन्नदी … ” (तेलगू) व ” माझे ताई ग , माझ्या दादा रं चल मतदान कराया जाऊ… ” (मराठी) अशा विविध बोलीभाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप कक्ष किनवटच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली.

किनवट : तालुक्यातील मांडवीच्या बाजारात स्वीप कक्षाच्या वतीने गोंडी , बंजारी , तेलगू व मराठी भाषेतील गीतांतून मतदार जनजागृती करतांना स्वीपचे सदस्य

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत (भाप्रसे) , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी मीनल करणवाल (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून 83-किनवट विधानसभा मतदारसंघातील किनवट व माहूर तालुक्यातील वाडी-तांडा ‘ पाडा-गुडा व सीमावर्ती अतिदुर्गम भागात जाऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी बहु भाषेतील प्रबोधन गीताच्या सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गट शिक्षणाधिकारी तथा स्विफ्ट कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वात स्वीप कक्षाचे सर्व सदस्य मागील लोकसभा निवडणुकीत 50% पेक्षा कमी मतदान झालेल्या गावी जाऊन त्यांच्या मातृभाषेत संवाद साधून, गीतातून, गृहभेटी देऊन, मतदानाचे महत्व पटवून देऊन मतदार जनजागृती करीत आहेत. यानुषंगाने पंचक्रोशीतील 52 गावातून बाजार करण्यासाठी येणाऱ्या मांडवी येथे मतदार जनजागृती प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
किनवट :तालुक्यातील मांडवी बाजारात आलेल्या कोलामपोड येथील मतदारांशी संवाद साधून मी मतदान करणारच अशी शपथ घेताना स्वीपचे सदस्य तथा केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे

या परिसरात गोंडी , बंजारी आणि सीमावर्ती भाग असल्याने तेलगू भाषिक मतदार असल्याने त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधून, गीतातून त्यांचे प्रबोधन करण्यात आले. स्वीप कक्ष सदस्य तथा केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे यांनी कोलामपोड येथील मतदारांशी संवाद साधून मतदानाचे महत्त्व त्यांना पटवून दिले. शाहीर प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाड्याच्या माध्यमातून प्रबोधन केले. प्रसिद्ध गायक सुरेश पाटील यांनी बंजारी व तेलगू भाषेतील बहारदार गीतांतून प्रबोधन केले. गीतकार रुपेश मुनेश्वर यांनी मराठी व गोंडी भाषेतील गीतांनी मतदानाचे महत्त्व त्यांच्या हृदयात ठसवले. भूमय्या इंदूरवार यांनी तेलगू भाषेतून व शेषराव पाटील यांनी मराठी भाषेतून मतदारांशी संवाद साधला. सूरज पाटील यांनी ढोलकीची उत्तम साथ संगत केली.

किनवट : स्वीप कक्षाच्या वतीने गोंडी , बंजारी , तेलगू व मराठी भाषेतील गीतांतून मतदार जनजागृती करतांना स्वीपचे सदस्य

यावेळी मांडवीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत रावळे, बीएलओ उषा येरेकार, दिलीप मांडण, अशोक हलवले उपस्थित होते .

213 Views
बातमी शेअर करा