KINWATTODAYSNEWS

सीमेलगतच्या अतिदूर्गम “पांगरपहाड” गावात  गोरमाटी मातृभाषेत केली मतदार जनजागृती * निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांचा अनोखा उपक्रम

किनवट : मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाच्या वतीने तालुक्यातील मराठवाड्याचं टोक असलेल्या तेलंगणाच्या सीमेलगतच्या अतिदूर्गम, डोंगरी “पांगरपहाड” गावात त्यांच्या गोरमाटी मातृभाषेत प्रबोधन करून तर आप्पारावपेठ येथे तेलगू भाषेतून लोकशाहीतील मतदानाचे महत्व पटवून दिल्याने मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
         नांदेडचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.   
      सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या संकल्पनेनुसार अनोखा उपक्रम राबवून लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी 50 टक्के पेक्षा कमी झाली अशा गावात मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाच्या वतीने प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यानुषंगाने लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकलेल्या पांगरपहाड या अतिदुर्ग , डोंगरी गावात विशेष भेट देऊन प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांनी गोरमाटी ( बंजारी) भाषेत नागरिकांना जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही असलेल्या भारतीय लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये आपल्या मताची काय किंमत आहे याची जाणीव सर्वांना करून दिली. या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. श्री  राठोड यांनी ग्रामस्थांची संवाद साधून त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक वविचार शासनापर्यंत पोहोचू असा आशावाद व्यक्त केला. यानंतर स्वीप कक्षातील शाहीर प्रोफेसर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी आपल्या शाहिरीतून  मतदानाचे महत्त्व गावकऱ्यांसमोर मांडले. त्यानंतर प्रसिद्ध गायक सुरेश पाटील यांनी आपल्या पहाडी आवाजाने “पांगरपहाड” दणानून सोडले. उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांनी आपल्या प्रबोधनातून मतदारांचे मन परिवर्तन केले. आप्पारावपेठ येथे शेषराव पाटील व भूमय्या इंदूरवार यांनी तेलगू भाषेतून जनतेशी आपुलकीने संवाद साधत मतदानाचे महत्त्व पटवून दिले. सुरज पाटील यांनी ढोलकीची उत्तम साथ दिली.

81 Views
बातमी शेअर करा