*टोलमाफी जाहीर केल्याने लाडक्या टोल कंत्राटदारांना किती मलई मिळणार?*
*मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील (MTHL) कार आणि लाईट मोटार वाहनांच्या टोल माफीचे काय?*
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर
मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती सरकारने जाणीवपूर्वक कानाडोळा केला. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ असल्याची जाणीव झाल्यानेच हादरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवरील टोल माफी जाहीर केली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवर (MTHL) टोल माफी करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली होती, त्या टोल माफीचे काय झाले? असा प्रश्न मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
भाजपा युती सरकारने घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, गेली दोन वर्ष आपल्या लाडक्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांच्या फायद्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राला खुलेआम लुटणाऱ्या या महाभ्रष्ट सरकारला जाता जाता जनतेची आठवण आली आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यांवर कार आणि इतर लाईट मोटार वाहनांना टोलमाफी देण्याची जनतेची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली होती. या बाबतीत ऑक्टोबर, २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खोटारडेपणाची पोलखोल देखील केली होती. सरकारची अवस्था “चादर लगी फटने तो खैरात लगी बटने”, अशी झाल्याने टोलमाफी देऊन मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
आज टोलमाफी जाहीर केली असली तरी आतापर्यंत टोलच्या माध्यमातून झालेल्या लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे काय? त्याची चौकशी कधी करणार? शिंदे सरकारने जी टोलमाफी जाहीर केली आहे त्यासाठी लाडक्या टोल कंत्राटदारांना किती मलाई मिळणार आहे? ते सांगावे व तो पैसा कुठून भरणार? मुंबई आणि मुंबईकरांना या सरकारने लुटण्याची एकही संधी सोडली नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगार गुजरातला पळवणाऱ्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करण्यासाठी टोलमाफी केली आहे. भाजपा युतीने काहीही केले तरी त्यांनी केलेले अन्याय, अत्याचार महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचार जनता विसरणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव केल्याशिवाय मुंबईकर शांत बसणार नाही, असेही खा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.