*मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री.*
*शिशुपालाप्रमाणे महायुतीच्या पापाचा घडा भरला; माताभगिनीच भ्रष्टयुतीला सत्तेतून बाहेर हाकलतील.*
*सणासुदीच्या काळातच खाद्यतेल व किराणा महागला, भाजपा सरकारमुळे गृहिणांचे बजेट कोलमडले.*
मुंबई, दि. ९ ऑक्टोबर
मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुण्याच्या बोपदेव भागात विद्यार्थीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला, त्याचे आरोपी अद्याप सापडले नाहीत तोच मुंबईत घटना घडली. दररोज कुठे ना कुठे महिलेवर अत्याचार केल्याच्या घटना होत आहेत. ‘लाडकी बहिण’चे ढोल पिटणारे सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असून शिशुपालाप्रमाणे महायुतीच्या पापाचा घडा भरला आहे. आता या सरकारला माताभगिनीच सत्तेतून बाहेर हाकलूल धडा शिकवतील, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
वांद्र्यात एका मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याच्या घटनेवर बोलताना खा. वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली, त्या म्हणाल्या की, बदलापुर घटनेतील आरोपीचे एन्काउंटर केल्यानंतर हातात पिस्तुल घेऊन ‘बदलापुरा’ असे होर्डिंग लावणाऱ्या गृहमंत्र्याला राज्यातील इतर भागात झालेल्या भगिनींवरील अत्याचार दिसत नाहीत का? पुण्याच्या बोपदेव भागात तरुणीवर सामुहिक अत्याचार होऊन ६-७ दिवस झाले पण अद्याप गुन्हेगारांचा शोध घेता आला नाही. राज्यात सातत्याने महिला अत्याचाराचा घटना घडत असताना राज्याचा गृहमंत्री काय झोपा काढतो काय? महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर खुर्चीला चिटकून कशाला बसता ? महाराष्ट्राला एवढा निष्क्रिय, अकार्यक्षम व निर्लज्ज गृहमंत्री कधीच लाभला नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा लाडकी बहिण योजनेसाठी सरकारी पैशावर जाहिरातबाजी व इव्हेंट करण्यात मग्न आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर मुख्यमंत्री शिंदे देखील गंभीर नाहीत हेच दिसत आहे.
*भाजपा सरकारने सणासुदीत महागाई वाढवून गृहिणांचे बजेट बिघडवले*.
महागाईच्या आगीत आधीच होरपळणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना भाजपा सरकारने आणखी एक झटका दिला आहे. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड मोठी वाढ केली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याचा सर्वात मोठा फटका माताभगिनींना बसला आहे. सणासुदीच्या काळात गृहिणींच्या किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. भाजपा युती सरकारला महागाईने माता-भगिनींचे होत असलेले प्रचंड हाल दिसत नाहीत. भाजपा सरकार १५०० रुपये देत असल्याचा मोठा गवगवा करत आहे पण सणासुदीच्या काळातच महागाई प्रचंड वाढवून हे नालायक सरकारने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय माता भगिनींच्या आनंदावर विरझण टाकले आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.