मुंबई, दि. ८ ऑक्टोबर
हरियाणा विधानसभेच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही. हरियाणा व महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असून या भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनता तयार आहे. राज्यातील जनतेचे समर्थन महाविकास आघाडीला मिळून मविआचे सरकार येईल, असा विश्वास महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी मुंबई विभागीय काँग्रेसची बैठक पार पडली. यानंतर रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले, चेन्नीथला पुढे म्हणाले की, हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांबरोबरच महाराष्ट्राचीही निवडणूक होणार होती पण आयोगाने ती घेतली नाही. हरियाणात काय झाले, पक्ष कुठे कमी पडला यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल पण त्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष एकजुटीने काम करत आहे.काँग्रेस व महाविकास आघाडीला अनुकुल वातावरण आहे तर भाजपा सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सरकारकडे पैसे नाहीत तरीही मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन धडाधड निर्णय घेतले जात आहेत. कंत्राटदारांचे ४० हजार कोटी रुपये सरकारने थकविले आहेत म्हणून कंत्राटदारांनी संप सुरु केला आहे. राज्यातील भाजपा सरकार आर्थिक संकटात आहे.लाडकी बहिण योजना ही केवळ निवडणुकीत महिलांची मते मिळावीत म्हणून सुरु केली आहे, सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. हे सरकार बदलण्यासाठी जनताही तयार आहे असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव मुंबई प्रभारी यु. बी. वेंकटेश, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, नगरसेवक मोहसिन हैदर, तुषार गायकवाड, महेन्द्र मुणगेकर, अखिलेश यादव, आनंद शुक्ला, आदी उपस्थित होते.