मांडवी : ता. किनवट येथील सरस विद्यालय (मराठी व इंग्रजी माध्यम) येथे दिनांक 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन ते 02 ऑक्टोबर 2024 गांधी जयंतीपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शासनाच्या वतीने विविध शालेय उपक्रम राबविण्याचे निर्देशित केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी आदेशित केल्याप्रमाणे प्रस्तुत शाळेत विविध उपक्रम पार पाडले.
या उपक्रमाचा भाग म्हणून मुक्तिसंग्रामाची चळवळ, इतिहास, महत्त्व याविषयी प्रबोधन करण्यात आले. शालेय परसबागेची स्वच्छता केली. त्याचबरोबर शालेय परिसर स्वच्छता, कचरामुक्त शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा हे उपक्रम राबवून हात धुवा मोहीम, शरिर स्वच्छता, शारिरीक आरोग्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रस्तुत पंधरवड्याचा शेवट आज 02 ऑक्टोबर 2024, बुधवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंती निमित्ताने वाद – विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्रथमतः महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बाल कलाकारांनी ग्राम स्वच्छता अभियानावर समर्पक नाटक सादर केले. तद्नंतर वाद- विवाद स्पर्धेला सुरुवात झाली. ही स्पर्धा दोन गटात पार पडली. लहान गट 5 ते 8 वी यांच्याकरिता विषय होता *शक्ती श्रेष्ठ की युक्ती* आणि मोठा गट 9 ते 12 वी करीता *मोबाईल शाप की वरदान*
दोन्ही गटात 45 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अभ्यासपूर्ण वैचारिक पध्दतीने तुटून पडत होते. त्यांच्यामध्ये चांगली जबरदस्त चुरस निर्माण झाली. परिक्षक म्हणून शिक्षक रमेश पडगिलवार, सतिश खडसे शिक्षिका सौ. आशा वाघमारे ,श्रीमती शेरे टिचर यांनी काम पाहिले.
मंचावर मुख्याध्यापक तथा प्राचार्य डाॅ.वसंत राठोड, प्रा. विजय जयस्वाल, जेष्ठ शिक्षक यादव जाधव, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक कुणाल राठोड, संतोष कांबळे, पालक शिवकुमार ठाकूर, विनायक राठोड उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते कृष्णा तिरकमवार, वर्ग 7 वा व आर्यन राठोड, वर्ग 6 वा या दोन गरीब विद्यार्थ्यांना सौ. आशा वाघमारे – खडसे आणि सतीश खडसे हे दाम्पत्य व डाॅ.वसंत राठोड यांनी शालेय गणवेश देऊन या बालकांचा आनंद द्विगुणित केला.
स्पर्धेनंतर शिक्षक रमेश पडगिलवार, कुणाल राठोड, सतीश खडसे आणि डाॅ.वसंत राठोड यांच्या बहारदार गीत संगीताचा कार्यक्रम पार पडला. यांनी विद्यार्थी- शिक्षकांकडून प्रचंड दाद मिळविली.
यावेळेस इंग्रजी मराठी माध्यमांचे तीनशेच्यावर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दोन्ही माध्यमांच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी पतंजली दुध बिस्किट वाटप करून पसायदानाने जयंती सोहळ्याची सांगता केली. अशा नानाविध उपक्रमाने प्रस्तुत पंधरवड्याचा शेवट केला.
*सरस विद्यालयात गांधी जयंती साजरी*
194 Views