किनवट/प्रतिनिधी: किनवट शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 161 ए मागील पाच ते सहा वर्षांपासून रेंगाळत पडल्याने व रस्त्यावरील खड्ड्यामुळे व धुळीमुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता. याबाबत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी शारदा कन्स्ट्रक्शन च्या वतीने पाच दिवसात आम्ही रस्ता दुरुस्त करणार असे लेखी आश्वासन देण्यात आले. दोन तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत केली. मागील पाच ते सहा वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अशोक स्तंभ व स्व. बाळासाहेब ठाकरे चौक गोकुंदा ते पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे व धुळीचे साम्राज्य होऊन अपघात ही झाले आहेत. याप्रकरणी वारंवारिक प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नसल्याने मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यांत सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून रस्ता रोको यशस्वी केले.
रास्ता रोको आंदोलनावेळी शासनाने नियुक्त केलेल्या शारदा कन्स्ट्रक्शन चे शेख जावेद व रोशन चव्हाण यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार त्वरित कामाला सुरुवात करून पाच दिवसात आम्ही रोडची दुरुस्ती करू असे लेखी पत्र मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षाकडे सोपीविल्याने दोन तास सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलन पाच दिवसासाठी मागे घेण्यात आले.
पाच दिवसानंतर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. याप्रसंगी वैजनाथ करपुडे पाटील, व्यंकट भंडारवार ,माजी नगराध्यक्ष के मूर्ती, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष दगडू भरकड, परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष फुलाजी गरड, जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर, तालुकाध्यक्ष प्रमोद पहुरकर, सचिव बालाजी शिरसाट, कार्याध्यक्ष किरण ठाकरे, बबन वानखेडे, विलास सूर्यवंशी ,दिलीप पाटील, गौतम येरेकर, दुर्गादास राठोड, विनोद भरणे, शरद जयस्वाल, अमरदीप कदम, प्रशांत कोरडे, प्रशांत सातुरवार, संदीप कराळे, सुनील चव्हाण, विश्वास कोल्हारीकर, नागनाथ भालेराव, मिलिंद धावारे, शैलेश गटलेवार स्वप्निल भालेराव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
किनवट शहरातील रस्ता दुरुस्तीसाठी पत्रकारांचा रास्ता रोको. पाच दिवसाचा दिला अल्टिमेट
81 Views