KINWATTODAYSNEWS

मुंबईच्या झोपडपट्टीतील कष्टकरी लोकांना उठविण्याचा भाजपाचा डाव – प्रा. वर्षाताई गायकवाड

उत्तर मुंबईतील झोपडपट्टीवासींना मीठागराच्या जागेवर पाठवण्याचा भाजपाचा अजेंडा गरिबांची थट्टा करणारा.

झोपडपट्टीवासीयांबदद्लचे पियुष गोयल यांचे विधान निषेधार्ह, जाहीर माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन करु: सुरेशचंद्र राजहंस

भारतीय जनता पक्षाचे धोरण गरिबी हटाव नसून गरीब हटाव.

मुंबई, दि. ३० मार्च
मुंबईतील झोपडपट्टी हटवून गरिब, कष्टकरी लोकांना मीठागराच्या जागेवर पाठवणार असल्याचे विधान भाजपाची गरिबांबद्दलची मानसिकता दर्शवते. धारावीतील स्थानिकांना बेघर करण्याचा मोदिनचा प्रयत्न सुरु असताना आता उत्तर मुंबईच्या झोपडपट्टीतील कष्टकरी, गरीब कुटुंबांनाही हद्दपार करण्याचा भाजपाचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे.

मुंबई काँग्रेसचे कार्यालय, राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईच्या उभारणीत इथल्या श्रमिक, कष्टकऱ्यांचा मोठा सहभाग आहे, मुंबईतील 65 टक्के लोक हे झोपडपट्ट्या आणि चाळीत रहातात, त्यांच्या पुनर्वसनासाठी काँग्रेसने सातत्याने धोरणे आखली आहेत. झोपडपट्ट्यांच्या जागीच पुनर्वसन करण्याचा नियम असताना पियुष गोयल झोपडीवासियांना मिठागरांकडे हाकलणारे कोण आहेत? झोपडीवासियांचा हक्क नाकारण्याची ही झुंडशाही आम्ही चालू देणार नाही. झोपडपट्ट्या बाहेर हाकला, चाळीतील लोक बाहेर काढा ही भाजपाची कपट निती आहे. झोपडपट्टीत रहाणाऱ्यांना अशा पद्धतीने इकडून तिकडे हलवायला ते गुरांचे गोठे नाहीत. धारावीतील जनतेला मुलुंड येथे हद्दपार करत आहेत परंतु पियुष गोयल आणि भाजपालाच लोक लोकसभा निवडणुकीत हद्दपार केल्यावाचून रहाणार नाहीत. भाजपाचे धोरण गरिबी हटाव नसून गरीब हटाव असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. गरिबांचे हक्क हिसकावून आपल्या श्रीमंत मित्रांच्या झोळीत भर घालण्याचे भाजपाने मागील १० वर्षात केले आहे. झोपडीवासियांबद्दल भाजपा आणि पियुष गोयल यांच्या तिरस्काराचा मुंबई काँग्रेस जाहीर निषेध करीत आहे.

भाजपा नेते पियुष गोयल यांचे विधान मनुवादी मानसिकतेचे असून त्यांचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे, ही मानसिकता गरिबांना सन्मानाने जगू देणारी नाही. लोकसभा निवडणुकीत ही गरिब जनताच पियुष गोयल व भाजपाचा पराभव करुन त्यांची जागा दाखवून देईल. गोयल यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मुंबई काँग्रेस स्लम विभागाचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

102 Views
बातमी शेअर करा