KINWATTODAYSNEWS

सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे -सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना (भाप्रसे)

किनवट : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आज तहसिल कार्यालयात विविध विभागाच्या बैठका घेण्यात आल्या. राजकीय पक्ष, माध्यम प्रतिनिधी, पोलिस पाटील ,स्वीप जनजागृती, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती यांच्यासह विविध स्तरावर बैठकी आज सुरू होत्या. आता सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.

तहसिल कार्यालयामध्ये आज सर्वप्रथम राजकीय पक्ष पदाधिकारी व माध्यम प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेच्या अंमलबजावणी पासून तर निवडणूक संपेपर्यंतच्या कार्यक्रमाबाबतची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. याशिवाय विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या पोस्टल वोटिंग कशा पद्धतीने होईल, केंद्रांची माहिती, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बद्दल शंका समाधान आणि मतदान करताना मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीला 15 हिगोली लोकसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांच्यासह तहसिलदार शारदा चौंडेकर (किनवट) व किशोर यादव (माहूर) , मुख्याधिकारी मुंगाजी काकडे , नायब तहसिलदार विकास राठोड , शेख एन.ए. अनिता कोलगणे , गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव , गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी अनेक शंकांचे समाधान करून घेतले. 15- हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या 83- किनवट विधानसभा मतदार संघातील राजकीय पक्षांचे व माध्यम प्रतिनिधींचे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये प्रशासनाला उत्तम सहकार्य लाभले असून सर्व समित्या कार्यान्वित झाल्या असून कोणत्याही माहितीसाठी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी केले. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना यादरम्यान कोणतीही माहिती लागल्यास एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या एक खिडकी कक्ष अंतर्गत उमेदवारांना वाहन परवाने झेंडे, पताके,चित्ररथ, मोबाईल व्हॅन,चौक सभा, जाहीर सभा, रॅली,उमेदवारांचे तात्पुरते प्रचार कार्यालय, हेलीपॅडचे अक्षांश रेखांश तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाकडून एसएमएस, ऑडिओ आणि व्हिडिओ व इतर प्रचार साहित्य परवानग्या देण्यासाठी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे व माध्यम कक्षाचे सहायक मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी आदर्श आचार संहिता व मीडिया प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे सहाय्यक अव्वल कारकून रामेश्वर मुंडे , मंडळ अधिकारी एम. डी. वांगीकर , मास्टर ट्रेनर एम. बी. स्वामी , तलाठी सचिन भालेराव , एम.के. सांगवीकर , निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक नितीन शिंदे , कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे संदीप पाटील आदींनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
दुपारच्या सत्रात किनवट-माहूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व विविध कक्षांचे प्रमुख व सहाय्यक अधिकारी-कर्मचारी यांची बैठक तहसीलदार शारदा चोंडीकर ,मुख्याधिकारी मुंगाजी काकडे , नायब तहसीलदार विकास राठोड व अनिता कोलगणे यांनी घेतली.

319 Views
बातमी शेअर करा