गोंदिया : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या सूचनेनुसार गोंदिया जिल्ह्याच्या वतीने विश्राम भवन येथे विशेष बैठकीचे आयोजन करून त्या बैठकीमध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ गोंदिया जिल्ह्याची कार्यकारिणी गठित करुन विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक नवराष्ट्रचे प्रतिनिधी सतीश पारधी यांची गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी निवड करुन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच गोंदिया येथील सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी बोलतांना म्हणाले की, पत्रकार डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणत्याही माध्यमाचा असो आपली बातमी प्रकाशित केल्यानंतर काही निर्भीड पत्रकारांना धमक्या येत असतात त्यामुळे पत्रकारांना पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे. पत्रकारांना मानधन, विमा, अधिस्वीकृती, आरोग्य सुविधा, विविध शासकीय समित्यावर सदस्य, ग्रामीण स्तरापासून ते राज्यस्तरावर अशासकीय सदस्य म्हणून पत्रकारांचे नियुक्ती करण्यात यावी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत सर्वानुमते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी सतीश पारधी, जिल्हा युवा उपाध्यक्षपदी सचिन बनसोड, गोंदिया तालुकाध्यक्षपदी मोहन तवाडे व आमगाव तालुका अध्यक्षपदी सरोज कावळे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष भार्गव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बोपचे, जिल्हा युवा अध्यक्ष देवेंद्र दमाहे, सचिन बनसोड, सरोज कावळे, मोहन तवाडे, नितेश आगासे, दिलीप चव्हाण, सुरेश साठवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर
75 Views