किनवट:गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील स्व.बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब कोलीनी रस्त्याचे काम त्वरित हाती न घेतल्यास 15 जुलै रोजी शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर आंदोलन करण्याची घोषणा शिवसेना नेते तथा दिशा समिती अध्यक्ष मारोती सुंकलवाड यांनी केली होती.
तसे निवेदनही पंचायत समितीला देण्यात आले होते तसेच हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील हे किनवट दौऱ्यावर असताना त्यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांनी किनवटचे गट विकास अधिकारी धनवे यांना त्वरित काम हाती घेण्याची सूचना केल्यावरून एकविरा मंदिरासमोरील खराब रस्त्याची डागडुजी करण्यात आली व नाल्या बांधकाम करण्याचे पत्र दिल्यामुळे नियोजित बांगड्याचे आहेर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
नुकतेच रुजू झालेले ग्रामसेवक प्रवीण रावळे यांनी सदरील काम हाती घेतलेली आहे.
स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे चौक ते पेटकूले नगर,हबीब कॉलनी हा रस्ता महत्त्वपूर्ण असून या रस्त्यावरच अनेक कोचिंग क्लासेस आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री विद्यार्थी- विद्यार्थिनींना या रस्त्यावरून येणे-जाणे करावे लागत असते. सदरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी नाली नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत आहे. या रस्त्याने जाणाऱ्यां येणा-र्यांना त्रास सहन करावा लागत होता.
परंतु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या ‘बांगड्या भरो’आंदोलनाला किनवट टुडे न्यूज च्या माध्यमातून वेळोवेळी प्रसिद्धी देण्यात आली. शिवसेनेच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची दखल घेतल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.