किनवट : धूर फवारणी करावी, नाल्या वाहत्या कराव्या, कोरडा दिवस पाळावा, आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून आरोग्यविषयक जनजागृती करावी,डेंग्यु आजारावर आरोग्य शिक्षण द्यावे. या विषयी सर्वांनी सतर्क राहून तालुक्यात एकही मृत्यू होणार नाही या बाबत दक्षता घ्यावी. असे आवाहन तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले.
तालुक्यात पसरत असलेल्या डेंग्यु सदृष्य आजारांवर प्रतिबंधात्मक कार्यावाही करण्याच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची तहसिलदार तथा तालुका दंडाअधिकारी यांच्या कक्षात बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी त्या मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मनोज घडसिंग , नागरी दवाखानाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. किरण नेम्माणीवार , नगर परिषदेचे स्वच्छता निरिक्षक तथा प्र. अधिक्षक चंद्रकांत दुधारे ,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (आरोग्य) अमृत तिरमनवार आदींसह तालुक्याती नऊ (सर्व) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी उपस्थीत होते.
प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांनी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील डेंग्यु सदृश्य आजारांचा अहवालासह आढावा घेताना काय उपाय योजना व प्रतिबांधात्मक कार्यावाही करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना तहसिलदार डॉ. मृणाल जाधव म्हणाल्या की, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर व स्वच्छता निरिक्षक यांनी नगर पालिका क्षेत्रातील प्रत्येक गाव, वाडी, तांडे व नागरी भागातील प्रत्येक वार्डात साचुन असलेले पाणी वाहते करावे, नाल्या साफ करुन वाहत्या कराव्या , केरकचरा असलेल्या ठिकाणांची स्वच्छता करावी , पाणी साचलेल्या ठिकाणांची अबेठिंग करावी आणि धुर फवारणी करावी तसेच दर आठवडयातून १ दिवस प्रत्येक शनिवार कोरडा दिवस पाळावा. सर्व वैद्यकिय अधिकारी यांनी व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांनी मुख्यालयी वास्तव्य करून राहावे. सदर काळात कोणाचीही रजा मान्य करण्यात येऊ नये जे रजेवर असतील त्यांच्या रजा रद्द करून कामावर बोलावुन घ्यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून घ्यावा. डेंग्यु सदृश्य आजारावर आरोग्य शिक्षण देण्यात यावे. त्यासाठी पॉम्पलेट , दवंडी व मंदिरावरील भोंग्यावरुन जन जागृती करावी. शहरी व ग्रामीण भागात डेंग्युमुळे एकही रुग्ण दगाऊ नये याची खबरदारी घ्यावी. असेही त्या म्हणाल्या.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी सतर्क राहून डेंग्यु विषयी जनजागृती करावी; तालुक्यात एकही मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी -तहसिलदार डॉ. मृणाल जाधव
198 Views