किनवट/प्रतिनिधी- गोकुंदा येथील महात्मा ज्योतीबा फुले शाळा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रोडरोमियोंचा उच्छाद वाढत असून यांमुळे शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनीना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या रोडरोमीयोंची मजल मुलींचा विनयभंग करण्या पर्यंत जात असून केवळ भीती मुळे काही पालक त्यांची तक्रार करण्यास धजावत नाही.तर यांमुळे आपली शाळा,शिक्षण बंद होईल या भितीने मुलीही हा प्रकार पालकांना न सांगता निमूटपणे सहन करत असल्याने या रोडरोमियोंना चांगलेच रान मोकळे झाले आहे पोलीसांनी यांना तत्काळ जेरबंद करुण कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे अन्यथा कायदा व सुव्यवस्था बाधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोकुंदा शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रोडरोमीओंनी पुन्हा डोके वर काढले आहे. महात्मा फुले विद्यालयात जाणार्या विद्यार्थीनींना त्याच विद्यालयाच्या परिसरातील चौकात, रेल्वेगेट अशा प्रमूख ठिकाणी टुकारांचे टोळके बसत विद्यार्थीनींना त्रास देत आहेत. पालकांनी कित्येकवेळा पोलीसांकडे रोडरोमीओंचा कायम बंदोबस्त करण्याची मागणी केली मात्र त्या प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करुन विद्यार्थीनी निर्भय वातावरणात विद्यालयात जातील अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. प्रधानमंत्रीजींचा “बेटी बचाओ-बेटी पढाओ” नारा खरा परंतू मुलींच्या संरक्षणाचे काय ? अखेर कोणाकडून संरक्षण कवच मागायचे ? या द्विधा मन:स्थितीत पालकांसह पाल्य अडकले आहेत. मुली शाळेत पाठवायच्या की नाही अशी समस्या निर्माण झाल्याचे वास्तवचित्र आहे.
प्रधानमांत्रीजी “बेटी पढाओ” हा तुमचा नारा बरोबर आहे. परंतू बेटी जर असुरक्षित असेल, तुमच्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या कानापर्यंत बेटी सुरक्षित नसल्याचा लोकांंचा आवाज पोहोचत नसेल, पोलीस यंत्रणा त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रोडरोमीओंच्या मुसक्या आवळत नसेल तर पालक आणि पाल्याची आर्त हाक कोणी ऐकायची ? असा संतप्त सवाल आहे. रोडरोमीओंना कायद्याचे कवचकुंडल असल्याने त्यांच्या विरुद्ध कोणी चक्कार शब्दही बोलण्याचे धाडस करीत नसल्याचे सांगण्यात आले. म्हणून त्यांनी असाच मुलींवरील अत्याचार निमुटपणे सहन करायचा का ? असा प्रश्न आहे.
गोकुंदा ग्रामपंचायतीच्या कृतीशुन्य आणि बोलघेवड्या प्रवृत्तीमुळे साध्या पोलीस चौकीसाठी दहा बाय दहा चौरस फुटाची उपजिल्हा रुग्णायलाकडे जाणार्या चौकात जागा देऊ शकले नाहीत. शेकडो ले-आऊटला मंजुरी देतांना सार्वजनिक हितासाठी सोडलेली मोकळी जागा गिळंकृत केल्याचा अनेकदा आरोप झाला आहे. म्हणून केवळ जागे अभावी पोलीस चौकी कार्यान्वित करता आली नाही ही लाजीरवाणी आणि संतापजनक बाब म्हणावी लागेल.
गोकुंदा शहरात रोड रोमियोच्या उच्छादाने विद्यार्थिनी हैराण ; पोलीसांनी यांना तत्काळ जेरबंद करुण कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी
223 Views