KINWATTODAYSNEWS

गोकुंदा ग्रामपंचायतअंतर्गत बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब चौकापर्यंतचा रस्ता दुरुस्त न झाल्यास 15 जुलै रोजी अधिकाऱ्यांना बांगड्याचा आहेर-मारोती सुंकलवाड

किनवट( प्रतिनिधी)
मागील कित्येक वर्षापासून नागरिकांच्या जीवावर बेतलेल्या गोकुंदा ग्रामपंचायतअंतर्गत बाळासाहेब ठाकरे चौक ते पेटकूलेनगर तसेच पेटकुले नगर ते हबीब चौकापर्यंतचा रस्ता दुरुस्त होत नसल्याने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून दोन्ही रस्ते दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर केली नाही तर गोकुंदा ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाच्या विरोधात दिनांक 15 जुलै रोजी अधिकाऱ्यांना बांगड्या घालून आहेर करण्याचा गंभीर इशारा ज्येष्ठ शिवसैनिक तथा दिशा समितीचे सदस्य मारोती सुन्कलवाड यांनी गट विकास अधिकारी किनवट यांना लेखी निवेदनातून दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की ग्रामपंचायत गोकुंदा अंतर्गत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक ते पेटकुले नगर व पेटकुलेनगर ते हबीब कॉलनी पर्यंतचा रस्ता मागील कित्येक वर्षापासून दुर्लक्षित आहे. दोन्ही रस्त्यावर दिवसभर वाहनांची व नागरिकांची प्रचंड वर्दळ असते.बाजारपेठेत जाण्यासाठी तसेच महाविद्यालयिन विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी हा एकमेव मार्ग आहे. पूर्वीपासूनच हे दोन्ही रस्ते अरुंद व खड्डेमय असल्यामुळे त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्याचे बांधकाम केलेले नसल्याने घराघरातील सांडपाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरून जीवघेणे पाण्याचे डबके तयार झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर या रस्त्यावरून चालताना जीवघेणी कसरत करावी लागते. धोकादायक खड्ड्यामुळे कित्येक वेळा या रस्त्यावर वाहनांचे अपघात झाले असून महिला व लहान मुलाबाळांना पाणी साचलेल्या खड्ड्यातून वाट काढावी लागत आहे. या दोन्ही रस्त्याची दुरवस्था वाहनधारक व नागरिकांच्या जीवावर बेतलेली असतानाही ग्रामपंचायत अथवा पंचायत समिती कार्यालय हे रस्ते दुरुस्त करण्यास तयार नाही. यापूर्वी रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे शेकडो वेळा लेखी विनंती अर्ज केले परंतु निर्लज्ज प्रशासनाणे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम केले.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून दोन्ही रस्त्यावर जागोजागी तलावा सारखे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. वाहनचालक व नागरिकांना पाणी साचलेल्या खड्यातुन मार्गक्रमण करण्याशिवाय गत्यंतर उरला नाही. प्रशासन नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवत असल्यामुळे नाईलाजास्तव शिवसेनेला मूर्दाड प्रशासनाविरोधात उग्र स्वरूपाची भूमिका घेणे भाग पडले असून प्रशासनाच्या या निर्लज्ज कारभाराच्या निषेधार्थ येत्या 15 जुलै 2021 रोजी दुपारी 12:00 वाजता पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी यांच्या तसेच गोकुंदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्या हातात बांगड्या घालून व आहेर देऊन निषेधात्मक आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ शिवसैनिक तथा दिशा समिती नांदेडचे सदस्य मारोती सुन्कलवाड यांनी निवेदनातून दिला आहे

828 Views
बातमी शेअर करा