मुंबई, दि. १० जून २०२३
मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री वर्षाताई गायकवाड यांची निवड करुन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मागासवर्गीय समाजाला योग्य न्याय दिला आहे. काँग्रेस हाच देशातील एकमेव पक्ष आहे जो सर्व समाज घटकांना न्याय देतो. वर्षाताई गायकवाड यांच्या रुपाने मुंबई काँग्रेसला उच्चशिक्षित, अनुभवी सक्षम व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, रयतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले नेतृत्व लाभले आहे, असे मातंग समाजाचे नेते व प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाची स्थापनाच मुंबईत झाली आणि मुंबईने स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाला मोठ-मोठे नेतेही दिले. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर ,अण्णा भाऊ साठे यांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा काँग्रेस पक्षाने नेहमीच जपला आहे. आज देशात धर्मांधशक्ती जाती-धर्मात वाद निर्माण करुन स्वतःची राजकीय पोळी भाजत असताना काँग्रेस नेतृत्वाने एका महिलेवर मुंबई काँग्रेसची जबाबदारी दिली हा मोठा राजकीय निर्णय आहे. या निर्णयामुळे दलित, मागास, वंचित, अल्पसंख्याक समाज, महिला वर्गांत मोठा उत्साह निर्माण झाला आहे. वर्षाताई गायकवाड या चारवेळा धारावी विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण खात्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, रयत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. एकनाथराव गायकवाड यांचा सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय वारसा त्यांच्या पाठीशी आहे. एकनाथराव गायकवाड यांच्यासारखाच दांडगा जनपंसर्क त्यांच्याकडे आहे. त्यांनी जोपासलेला “हम सब एक है” हा विचार, त्यांना असलेला अनुभव व जनतेची समर्थ साथ यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करतील व आगामी काळात होणाऱ्या निडणुकात मुंबईत चांगले यश मिळवून देतील असा विश्वास आहे.
वर्षाताई गायकवाड यांची नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जून खर्गे, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करत वर्षाताई यांच्या राजकीय वाटचालीस राजहंस यांनी शुभेच्छा दिल्या.