*“शासन आपल्या दारी” अभियानानिमित्त मंगलसांगवीत महिला मेळावा..महिला शक्ती एकवटली याचे समाधान-वर्षा ठाकूर-घुगे*
·
*1 हजार 310 ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी दोन कतृत्त्वान महिलांची स्थानिक समित्यांकडून निवड*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.31.महिला व बालविकासासाठी झटणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या समंजस कार्यशैलीचा गौरव व्हावा या उद्देशाने प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर दोन कर्तबगार महिलांचा आज गौरव करण्यात आला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या नावे “महिला सन्मान पुरस्कार” राज्यातील सर्व ग्रामपंचायत, गटग्रामपंचायतीमध्ये आज प्रदान करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 310 ग्रामपंचायत क्षेत्रातील 2 हजार 620 कतृत्त्वान महिलांचा या पुरस्काराने सन्मान झाला. ग्रामपंचाय पातळीवर स्थानिक समित्यांकडून पुरस्कारार्थींची निवड करून सर्व सहमतीच्या सकारात्मक कार्याचा नवापायंडा पाडला याचा मला मनापासून आनंद व समाधान असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
कंधार तालुक्यातील मंगलसांगवी या खेड्यात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.या समारंभात त्या बोलत होत्या.
यावेळी जि.प.महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार,पुरस्कार प्राप्त स्नेहलता उपाध्ये, चौतराबाई वाघमारे,सुनित्रा कदम व मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात महिला बचतगटाचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. लाखो महिला बचतगटाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साध्य करून घेत आहेत.
कुटुंबातील एक महिला पुढे आली तर संपूर्ण कुटूंब पुढे येते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या जीवन कार्यातून महिला कतृत्त्वाचा आदर्श मापदंड निर्माण करून दिला आहे.
महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या आदर्शाला अधोरेखीत करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत कामाचा आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. शासनाची यामागची भूमिका ही महिला शक्तीच्या कतृत्त्वाला चालना देण्याची असून हे पुरस्कार यापुढेही सुरू राहतील, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन महिलांची निवड या गौरवासाठी करण्यात आली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त हे पुरस्कार आज वितरीत करण्यात आले. मंगलसांगवी येथील कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती सांगून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी आपल्या मनोगतात शासनाच्या योजनांची माहिती दिली.
समाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय व्यक्तीसाठी असलेल्या दुग्ध व्यवसाय योजनांच्या चार लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्राचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ व रोख रक्कम 500 रु. प्रती महिला याप्रमाणे पुरस्काराचे स्वरूप आहे.
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट / उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिला,सदर महिला या त्या ग्रामपंचायतीतील / गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी,अशी अट पुरस्कारासाठी ठेवण्यात आली.महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असणाऱ्या कतृत्त्वान महिला पुरस्कारासाठी पात्र असतील.बाल विवाह प्रतिबंध,हुंडा निमुर्लन, लिंग चिकित्सा प्रतिबंध घरगुती हिंसा प्रतिबंध,महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचतगट, आरोग्य,साक्षरता,मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे महिलांनी पुढाकार घेतलेला असावा.याचबरोबर त्यांचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती / गट ग्रामपंचायतीमध्ये किमान 3 वर्ष कार्य केलेले असावे,असे अटी व नियमामध्ये शासन निर्णयात स्पष्ट केलेले आहे.