KINWATTODAYSNEWS

नांदेडच्या तृतीयपंथी सेजलचे बारावी परीक्षेत यश लातूर विभागातून उत्तीर्ण होणारी ठरली पहिलीच ट्रान्सजेंडर

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.29.समाजातील तृतीयपंथी,किन्नर म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते म्हणजे टाळ्या वाजवून पैसे मागणाऱ्या व नशिबी कायम उपेक्षा असलेल्या त्या परंतु निसर्गाने दिलेल्या या शापापुढे रडत बसण्यापेक्षा लढण्याची जिद्द मनी ठेवून अनेकजण विविध क्षेत्रात संघर्षातून यशोशिखर गाठतात.मराठवाड्यातील नांदेड येथील एका किन्नरने बारावी परीक्षेच्या कला शाखेत 62 टक्के गुण घेत यश संपादन केले आहे.

शहरातील तरोडा भागात राहणाऱ्या अमोल (सेजल) भगवान सर्जे हीने अकरावी आणि बारावीसाठी उच्च माध्यमिक आश्रमशाळा,शिवाजीनगर तांडा ता.जळकोट,जि.लातूर येथे प्रवेश घेतला. वडील ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरची परिस्थिती हलाखीची. त्यात अमोलला (सेजल) आपण ट्रान्सजेंडर असल्याचे समजल्याने आपल्या हैदराबाद येथील गुरुकडे राहण्याचा निर्णय घेतला.तसेच कोणत्याही खासगी शिकवण्या न लावता स्वतःअभ्यास करून सेजल सर्जे हीने बारावी कला शाखेत 62 टक्के गुण घेवून उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.तिला इंग्रजी विषयात 45 गुण असून मराठी 64 इतिहास 61.राज्यशास्त्र-67, समाजशास्त्र 80 आणि अर्थशास्त्र विषयात 55 गुण मिळाले आहेत.

*बारावी उत्तीर्ण होणारी ठरली पहिलीच ट्रान्सजेंडर*

लातूर विभागातून ट्रान्सजेंडर म्हणून बारावीत उत्तीर्ण होणारी सेजल ही पहिलीच ठरली असून तिच्या या यशाचे सर्व- स्तरातून स्वागत होत आहे.

दरम्यान,यावेळी बोलताना सेजल सर्जे म्हणाली.मला उच्च शिक्षण घेवून ट्रान्सजेंडरसाठीच काम करायचे आहे. भविष्यात सामाजिक कार्यातून ट्रान्सजेंडरची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मानस सेजलने बोलून दाखविला आहे.

112 Views
बातमी शेअर करा