नांदेड, दि. 20 ः देशामध्ये मोदी सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. जनतेचा मुड बदलला आहे. कर्नाटकचे निकाल हे याची प्रचिती देणारे आहेत. काँग्रेस पक्षाने याच पद्धतीने लोकांमध्ये जावून काम करण्याचा निर्धार करुन 100 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकल्या तर 2024 मध्ये देशाचा पंतप्रधान काँग्रेस पक्षाचा होईल असा विश्वास व्यक्त करताना शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी त्यांच्या प्रकट मुलाखतीतून आपला जीवनपट मांडला. भाजपाचा डबल इंजिनचा प्रयोग कर्नाटकात फसला असून आमचे सिंगल इंजिन पॉवरफुल असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगीतले.
दै. सत्यप्रभाने नव्यानेच उभारलेल्या कार्यालयाच्या परिसरात खा. संजय राऊत यांची प्रकट मुलाखत आयोजित केली होती. या वेळी खा. संजय राऊत व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. व्यासापीठावर दै. सकाळचे मुंबई येथील वरीष्ठ पत्रकार तथा मुलाखतकार संजय मिस्कीन, दै.सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा.संजय राऊत म्हणाले, की ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय संस्थांकडून विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयोग सुरू आहे. विरोधकांमध्ये भिती निर्माण करुन कायम सत्तेत राहण्याच्या आसुरी महत्वकांक्षेपोटी भाजपाकडून वेगवेगळे दबावतंत्र वापरले जात आहे. परंतु, या सर्व बाबींना आपण कधीच भिक घातली नाही. येणार काळ हा देशासाठी संक्रमण अवस्थेचा असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या मुलाखतीतून सांगीतले.
मी जरी राजकारणात असलो तरी माझा खरा पिंड पत्रकारितेचा आहे. आजही मी कुठेही असलो तरी बरोबर 11 वाजता हातात पेन घेवून अग्रलेख आणि बातमी लिहितो. दै.सामनाचा संपादक होण्यापूर्वी आपण लोकप्रभासाठी क्राईम रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दादागिरी करणाऱ्या लोकांची मला कधीच भिती वाटली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या आपण मुशीत वाढलो असून त्यांचे राज्यातील व देशातील नेत्यांबद्दल काय मत होते, हे मला चांगले माहिती आहे. बाळासाहेब यांचे डॉ. शंकरराव चव्हाण व शरद पवार यांच्यासोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी डॉ.शंकरराव चव्हाण यांचे कडक शिस्तीचा नेता म्हणून नेहमीच कौतूक केले, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
—
विकासासाठी आमचे एकच इंजिन सक्षम ः अशोकराव चव्हाण
पहिले इंजिन फेल झाल्यावर दुसऱ्या इंजिनाची गरज असते. परंतू, आमच्या महाविकास आघाडीचे एकच इंजिन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व विकासासाठी सक्षम आहे. त्यामुळे डबल इंजिनचे सरकार असा प्रचार करणाऱ्या भाजपाचे दोन्ही इंजिन फेल झाले असून विकासासाठी आमचे एकच इंजिन सक्षम असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अडीच वर्षांच्या काळात सरकारने जनतेसाठी अनेक चांगली कामे केली. जनता आता जागरुक झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राज्यात याचा प्रत्यय आला असून कर्नाटकच्या निवडणुकीत बजरंगबलीचा जप करणाऱ्या भाजपाला बजरंगबलींनी साथ न देता बजरंगबली काँग्रेस पक्षालाच पावला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पांडागळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार दै.सत्यप्रभाचे संचालक बालाजीराव जाधव यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी खा. सुभाष वानखेडे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात, आ. मोहनराव हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव बेटमोगरेकर, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. रोहिदास चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा आशाताई शिंदे, प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी मारोतराव कवळे गुरुजी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नरेंद्र चव्हाण, सत्यप्रभाचे संचालक संदीप पाटील, जि.प. माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी महापौर जयश्री पावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हाप्रमुख माधव पावडे, बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, उपसभापती भुजंग पाटील, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, शमीम अब्दुल्ला, मसूदखान, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, जि.प.चे माजी सभापती ॲड. रामराव नाईक, दैनिक सत्यप्रभाचे माजी संपादक ओमप्रकाश चालिकवार, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, सतीश सामते, माजी उपमहापौर आनंद चव्हाण सोशल मीडीयाचे इजिं.हरजिंदर सिंघ संधू शहर जिल्हाध्यक्ष यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
देशाचा पंतप्रधान काँग्रेस पक्षाचा होईल ः खा.राऊत प्रकट मुलाखतीतून उलघडला जीवनपट; एकच इंजिन पावरफुल ः अशोकराव चव्हाण
90 Views