नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या ४० सदस्यीय यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधींसमवेत महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांनी आज ही यादी जाहीर केली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी के शिवकुमार, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या,राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल, कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, जगदीश शेट्टर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुख्खू, पी. चिदंबरम, शशी थरूर, रमेश चेन्नीथला, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास, राज बब्बर, मोहम्मद अझरुद्दीन, इम्रान प्रतापगढी, कन्हैया कुमार आदींचा काँग्रेस स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. कर्नाटकच्या २२४ सदस्यीय विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार असून, १३ मे रोजी मतमोजणी होईल.